कल्याण-बदलापूर चौपदरी आणि बोरिवली-विरार सहापदरी करणार

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गाला समांतर मेट्रो रेल्वे प्रकल्प होत असल्याने चर्चगेट ते विरार उन्नत (एलिव्हेटेड) प्रकल्प फायेदशीर ठरणार नाही, अशी उपरती झाल्याने पश्चिम रेल्वेवरील बहुचर्चित उन्नत प्रकल्प मुंबई रेल्वे विकास मंडळाने गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी एमआरव्हीसीकडून चार नवीन प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

उन्नतऐवजी हार्बरचा गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत विस्तार, बोरिवली ते विरार पाचवा-सहावा मार्ग, कल्याण ते आसनगाव चौथा मार्ग आणि सर्वात महत्त्वाचा कल्याण ते बदलापूर तिसरा-चौथा मार्ग या चार प्रकल्पांवर भर दिला जाणार आहे. हे चारही प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे एक ते दीड महिन्यात मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शनिवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत एमआरव्हीसी, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आता मध्य रेल्वेवर कल्याण ते बदलापूर आणि कल्याण ते आसनगाव हे मार्ग चौपदरी केले जाणार आहेत. तसेच बोरिवली-विरार हा मार्ग सहापदरी केला जाणार आहे. सध्या  या मार्गावरून उपनगरी गाडय़ा आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावत असल्याने वेळापत्रकावर परिणाम होतो. या मार्गिकाविस्तारांनी उपनगरी सेवा अधिक गतिमान होतील. कल्याण ते आसनगावपर्यंत तिसऱ्या मार्गाचे काम सुरूही झाले आहे.