विरार-चर्चगेटदरम्यानच्या १२ फेऱ्यांवर कुऱ्हाड

वातानुकूलित गाडीमुळे नियमित फेऱ्या रद्द झालेल्या बोरिवलीकर प्रवाशांचा सध्या जो खोळंबा होत आहे, तो १ जानेवारीपासून वसई-विरारकरांच्या वाटय़ाला येणार आहे. २५ डिसेंबरपासून पुढील पाच दिवस ही गाडी चर्चगेट ते बोरिवली अशी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येत आहे. मात्र या गाडीच्या सहा फेऱ्या चालविताना या मार्गावरील अनेक नियमित गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. १ जानेवारीपासून ही गाडी विरार ते चर्चगेट अशी चालविताना या दरम्यानच्या तब्बल १२ फेऱ्यांवर कुऱ्हाड येणार आहे. थोडक्यात वातानुकूलित गाडीमुळे सध्या बोरिवलीकर जात्यात भरडले जात असले तरी नव्या वर्षांत ही वेळ सध्या सुपात असलेल्या वसई-विरारकरांवर येणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर असलेले एसी लोकलचे वेळापत्रक १ जानेवारी, २०१८पासून पूर्णपणे बदलणार आहे. एकूण बारा नव्या फेऱ्यांमध्ये विरारपासून चर्चगेटच्या दिशेने चार आणि चर्चगेट ते विरार चार जलद लोकल फेऱ्या असतील. या फेऱ्या सुरू करताना सध्याच्या नियमित जलद लोकल फेऱ्यांवर गदा येणार असल्याने विरार, वसई, भाईंदर प्रवाशांची कसोटी लागणार आहे.

सध्या एसी लोकलला मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी स्थानकात थांबा दिला जातो. परंतु, नियमित गाडय़ांनी जाणाऱ्या प्रवाशांना या महागडय़ा गाडीने प्रवास करणे परवडणारे नाही. सकाळी १० आणि दुपारी १२च्या सुमारास बोरिवलीहून सुटणाऱ्या नियमित गाडय़ा यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. या शिवाय बोरिवलीहून सुटणाऱ्या इतरही गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही दिवसांनी हीच परिस्थिती बोरीवली ते विरार दरम्यानच्या प्रवाशांवरही ओढवणार आहे. विरारहून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ांना थेट वसई, भाईंदर स्थानकात थांबा आहे.

वातानुकूलित लोकल गाडीलाही या दोन स्थानकात थांबा देण्यात आला असून वसई आणि भाईंदर स्थानकातील प्रवाशांचीही गैरसोय होऊ शकते.

नव्या वेळापत्रकात विरार ते चर्चगेटसाठी चार, बोरीवली ते चर्चगेटसाठी दोन आणि चर्चगेट ते विरार चार, चर्चगेट ते बोरीवली एक अशा जलद लोकल फेऱ्या आणि महालक्ष्मी ते बोरीवली धीम्या मार्गावर एसी लोकल चालविली जाणार आहे.

वातानुकूलित लोकल सुरु करताना सध्याच्या लोकल फेऱ्या बंद करणे चुकीचे आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

वातानुकूलित लोकलचे आम्ही स्वागतच करतो. मात्र आमची नियमित गाडी रद्द करण्याऐवजी वातानुकूलित लोकलची नवीन फेरी सुरू करायला हवी.

देवेंद्र व्यास, प्रवासी

कित्येक वर्षांपासून बोरिवली ते चर्चगेट प्रवास करतो आहे. मात्र १२.२४ जलद लोकलच रद्द करण्यात आल्याने विरारहून चर्चगेटला जाणाऱ्या गाडीतून जावे लागते. त्या आधीच खचाखच भरलेल्या असतात. नाईलाजाने उभ्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे आम्हा प्रथम श्रेणीच्या पासधारकांना तरी वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी.

राकेश मेहता, प्रवासी

वातानुकूलित गाडी चालविण्याकरिता सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता. अन्यथा वातानुकूलित लोकल सुरू करणे कठीण झाले असते.

वरिष्ठ अधिकारी, पश्चिम रेल्वे