29 October 2020

News Flash

गुन्हेगारांना वाचविण्यासाठी गुन्हे अन्यत्र ‘वर्ग’ करण्याचा प्रकार

एजाझ लकडावाला प्रकरणातून पोलिसांच्या कार्यपद्धती उघड

एजाझ लकडावाला

एजाझ लकडावाला प्रकरणातून पोलिसांच्या कार्यपद्धती उघड

जयेश शिरसाट, लोकसत्ता

मुंबई : कुख्यात गुंड एजाझ लकडावाला प्रकरणाच्या तपासातून पोलीस आणि संघटित गुन्हेगारी टोळ्या तसेच सराईत गुन्हेगारांचे साटेलोटे स्पष्ट करणारी प्रकरणे उजेडात येत आहेत. एजाझच्या साथीदारांविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्हा दडपण्यासाठी पोलिसांनी केलेली धडपड गुन्हे शाखा तपासणार आहे.

ठरावीक ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील खबरी, अशी ओळख असलेला सलीम महाराज आणि सारा-सहारा खटल्यात मोक्का न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला तारिक परवीन, या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. खंडणीसाठी धमकावता यावे यासाठी मुंबईतील व्यावसायिक, व्यापाऱ्यांची नेमकी माहिती एजाझला पुरवल्याचा दोघांवर आरोप आहे. चौकशीत हे दोघे अनेक वर्षे सोने तस्करीतही गुंतल्याची माहिती पुढे आली. २०१७च्या अखेरीस दुबईतून तस्करी केलेले सोने मधल्यामधे हडपले, या संशयावरून ३८ वर्षीय महिला आणि तिच्या भावाला सलीम व तारिक यांनी बेदम मारहाण केली. तसेच दोघांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. जखमी भावंडांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तारिक, सलीमसह अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला. मात्र अवघ्या दोन तासांत हे प्रकरण पायधुनी पोलीस ठाण्याकडून काढून घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए मार्ग) पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. दोन्ही पोलीस ठाणी भिन्न परिमंडळांत (झोन) मोडतात. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत या प्रकरणाची कागदपत्रे एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात धूळ खात पडून आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

हे प्रकरण अन्य पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे आदेश कोणी दिले? आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोने तस्करीशी संबंधीत असल्याने तपासाची व्याप्ती मोठी होती मात्र एमआरए मार्ग पोलिसांनी अचूक कायद्यान्वये कलमे वाढवली नाहीत या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करेल, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पायधुनीहून एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेले प्रकरण अद्यापही तपासाधिनच होते, अशी सूचक प्रतिक्रिया सह आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी यांनी दिली. अधिक माहिती देणे मात्र त्यांनी टाळले.

संघटित गुन्हेगारी टोळीशी संबंधीत हॉटेल व्यावसायिकाविरोधात गेल्या वर्षी पश्चिम उपनगरातील पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याला अटकही केली गेली. मात्र हे प्रकरण भिन्न परिमंडळातील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. पुढे पीडित महिलेची तक्रार खोटी असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 2:25 am

Web Title: cid investigating police connection with gangster ejaz lakdawala aide zws 70
Next Stories
1 मतभिन्नता हा सर्जनशीलतेचा आत्मा!
2 ..पण मुंबई सोडून जायचे नव्हते! – न्या.धर्माधिकारी
3 शहरी नक्षलवाद : गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांना दिलासा नाहीच!
Just Now!
X