तापावरील उपचारांसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या २८ महिलांना प्रतिजैविक इंजेक्शनची बाधा होऊन त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली असून न्यायालयाने राज्य सरकार, आरोग्य खाते, पालिका प्रशासन आणि गृहखात्याला नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने याप्रकरणी कारवाई केली असून संबंधित इंजेक्शन रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाच्या अधीक्षकांना पालिकेनेही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र केतन तिरोडकर यांनी याचिकेद्वारे प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे. शिवाय अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, पालिका रुग्णालये व औषध कंपन्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांना सेफ्ट्रायअ‍ॅक्सोल आणि सेफोटॅक्झाइन या दोन प्रकारची प्रतिजैविक (अ‍ॅण्टिबायोटिक्स) इंजेक्शन देण्यात आली. संबंधित इंजेक्शन पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याकडून घेण्यात आली होती. या इंजेक्शनचा रंग नेहमीच्या फिकट पिवळावरून गडद पिवळा झाल्याचे दिसले. या इंजेक्शननंतर महिलांना त्रास जाणवू लागला. असाच प्रकार भिवंडी येथेही घडला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागातर्फे चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद करीत तसे आदेश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.