करोनामुळे चार महिने बंद असलेल्या आणि व्यवसाय नसल्याने  अडचणीत आलेल्या देशभरातील चित्रपटगृहांच्या मालकांनी  मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजमाध्यमावर ‘चित्रपटगृह वाचवा’ अशी मोहीम सुरू केली आहे. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे केंद्राला चित्रपटगृह सुरू करण्याविषयी मागणी करण्यात आली आहे.

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर केंद्र सरकारने चित्रपट, वेब सीरिजच्या चित्रीकरणास परवानगी दिली असली तरी अजूनही चित्रपटगृहे बंदच आहे. या चार महिन्यात काहीच व्यवसाय नसल्याने मालमत्ता कर, वीज देयके, कर्मचाऱ्यांचे वेतन देताना चित्रपटगृह मालकांच्या नाकीनऊ येत आहेत. व्यवसाय डबघाईला आल्याने देशातील अनेक चित्रपटगृहे बंद करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहांच्या मालकांनी कर अथवा देयकात सूट देण्याची मागणी राज्य शासनाला केली असून देशभरातील मालकांनी एकत्र येत रविवारी सायंकाळी ट्विटर, फेसबुकवर ‘चित्रपटगृह वाचवा’ ही मोहीम राबवली.

#‘सपोर्ट मूव्ही थिएटर्स’ आणि #‘सेव्ह सिनेमा’ या हॅशटॅगद्वारे त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. निर्माता बोनी कपूर, अभिनेता प्रवीण दबस, अभिमन्यू दसानी यांनीही समाजमाध्यमावर या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. मनोरंजनसृष्टी ही देशाच्या आर्थिक विकासातील महत्त्वाची आहे. यावर अनेक लोकांची उपजीविका चालते. इतर अनेक देशांत चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. तरी केंद्र सरकारने देशातील चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. या मोहिमेबद्दल ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्सिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले की, ‘देशातील चित्रपटगृह मालकाची परिस्थिती गंभीर आहे. याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे वारंवार निवेदन करूनही काही उपयोग झाला नाही. राज्य शासनाने लवकर चित्रपटगृहे सुरू करावी’ असे त्यांनी स्पष्ट केले.