ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या नव्या चित्रपटांना नकार

मुंबई : सात महिन्यांच्या बंदीनंतर देशभरात निवडक राज्यांत चित्रपटगृहांची दारे उघडली गेली आहेत. हातात नवीन चित्रपट नाहीत, पन्नास टक्के  क्षमतेत चित्रपटगृहे चालवायची आहेत आणि प्रेक्षकही इतक्या लवकर करोनाचा धोका पत्करून सहकुटुंब चित्रपटगृहात यायला तयार होणार नाहीत. भीती आणि अनिश्चिततेची टांगती तलवार घेऊन सुरू झालेली चित्रपटगृहे सध्या तरी ‘थप्पड’, ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘के दारनाथ’ अशा आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचेच खेळ रंगवणार आहेत. निर्माते-दिग्दर्शक अजूनही महाराष्ट्रात चित्रपटगृहे कधी सुरू होणार, याची वाट पाहात असून तिथे घोषणा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दिवाळीपासून नवीन चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळतील, असा विश्वास ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त के ला आहे.

देशभरात १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सध्या चित्रपटगृह मालकांकडे प्रेक्षकांना दाखवण्यासाठी कोणतेही नवीन चित्रपट उपलब्ध नाहीत. गेल्या चार-पाच महिन्यांत अनेक छोटे-मोठे हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. पण ओटीटीवर थेट प्रदर्शित झालेले चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करण्यास बहुपडदा चित्रपटगृहांच्या संघटनांनी साफ नकार दिला आहे. ज्यांनी आपले चित्रपट याआधीच ओटीटीवर प्रदर्शित के ले आहेत, ते स्वत:हून पुन्हा चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत. कारण चित्रपटगृहातून चित्रपट दाखवण्यासाठी त्यांना प्रत्येक चित्रपटगृहामागे २३ ते २५ हजार रुपये भरावे लागतील. शिवाय, प्रसिद्धीचा वेगळा खर्च करावा लागेल. त्यामुळे निर्माते स्वत:हून हा खर्च ओढवून घेणार नाहीत, असे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी स्पष्ट

के ले. सध्या तरी जुन्याच चित्रपटांवर पहिले काही आठवडे निभवावे लागणार आहेत. जानेवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘तान्हाजी’, ‘मलंग’ या चित्रपटांनी चांगली कमाई के ली होती, तर ‘थप्पड’ आणि ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र नव्याने आलेल्या चित्रपटांमुळे त्यांना आपला व्यवसाय आवरता घ्यावा लागला होता. त्यांच्यासाठी हे आठवडे कमाईची नवी संधी ठरणार आहेत.

खरी सुरुवात दिवाळीपासून…

नोव्हेंबर महिन्यात कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला ‘इंदु की जवानी’ आणि मनोज वाजपेयी-दिलजीत दोसैन अशी वेगळी जोडी असलेला ‘सूरज पे मंगल भारी’ हे दोन नवीन चित्रपट चित्रपटगृहांमधूनच प्रदर्शित के ले जाणार आहेत.  यशराजची निर्मिती असलेला परिणीती चोप्रा-अर्जुन कपूर जोडीचा ‘संदीप और पिंकी फरार’, ‘बंटी बबली २’ हे नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, अशी माहिती ट्रेड विश्लेषक कोमल नहाटा यांनी दिली आहे. या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी काही दिवस  हातात असल्याने दिवाळीपासून नव्या चित्रपटांची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, असे अतुल मोहन यांनी सांगितले.

ओटीटीवरील चित्रपटांसाठी नकारघंटा कायम

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा अक्षय कु मारचाचित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर डिस्नो हॉटस्टार वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटीच्या बरोबरीने चित्रपटगृहात दाखवण्याच्या दृष्टीने एकपडदा चित्रपटगृह मालकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र हा चित्रपट चित्रपटगृहातून दाखवला जाऊ शकणार नाही, त्या पद्धतीनेच ओटीटी वाहिनीशी करार केला असल्याचे अतुल मोहन यांनी स्पष्ट के ले. झी स्टुडिओजचा ‘खाली पिली’ हा चित्रपट ‘डायरेक्ट टू होम’ पद्धतीने ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याने तो चित्रपटगृहातून दाखवला जाणार आहे. मात्र ओटीटीवर प्रदर्शित झालेले चित्रपट चित्रपटगृहातून प्रदर्शित करायचा चुकीचा पायंडा पडू द्यायचा नाही, यावर चित्रपटगृह मालक ठाम आहेत.