News Flash

उपाहारगृहे आणि मद्यालये रात्री १ पर्यंत सुरू

एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या.

 

मुंबई पालिकेची परवानगी

मुंबई : मुंबईमधील हॉटेल, रेस्तराँ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या वेळेत खुली ठेवण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत, तर मद्यविक्रीची दुकाने (वाईन शॉप) सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात सुरू ठेवता येणार आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी याबाबत शनिवारी परिपत्रक जारी केले.

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अटीसापेक्ष मर्यादित वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली. मर्यादित वेळ आणि ग्राहकांच्या संख्येवर घातलेल्या निर्बंधांमुळे अनेक हॉटेल मालकांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली होती. या निर्बंधांमुळे खर्च आणि उत्पन्नाचा  ताळमेळ बसत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.

एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दुकाने, तर सकाळी १० ते रात्री १०.३० या काळात मद्यविक्रीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हॉटेल, रेस्तराँ आदी रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी होती. परिणामी, आता मुंबई हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्याचे चित्र आहे.

नियम मात्र कायम…

करोना प्रादुर्भाव अद्याप पूर्णत: आटोक्यात न आल्याने हॉटेल, रेस्तराँ, मद्यालयांमध्ये जाणाऱ्यांना निर्बंध पाळावेच लागणार आहेत. शारीरिक अंतर, मुखपट्टीचा वापर आणि अन्य उपाययोजनांचे पालन अनिवार्य आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २०१५ मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंडसंहिता, १८६० मधील कलम १८८ आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 2:55 am

Web Title: circular issued by mumbai municipal commissioner akp 94
Next Stories
1 सामाजिक समतोलासाठी ‘ओबीसी’ चेहरा
2 महाविद्यालयात समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्या!
3 टाळेबंदीतही वाचनयात्रा अखंड सुरू
Just Now!
X