दिल्लीतून काही काळापूर्वीच मुंबईत आलेल्या सीआयएसफच्या जवानाने सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. जवान भैरव नायक (वय-४२) असे या जवानाचे नाव आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या सांताक्रुझ येथील कार्यालयात भैरव नायक ड्युटीवर होते. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला अचानक आपण महत्त्वाच्या कामासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या जवानाने आत्महत्या का केली त्याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भैरव नायक हे मूळचे राजस्थान येथील होते. मुंबईत येण्यापूर्वी ते दिल्लीत कार्यरत होते. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ते ड्युटीवर होते. त्यानंतर मात्र सहकाऱ्याला सांगून त्यांनी तिस्ता सेटलवाड यांचे कार्यालय सोडले. त्यानंतरच त्यांनी आत्महत्या केली. भैरव नायक यांनी नैराशातून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.