नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राज्यभरात मोहीम; मुख्यमंत्र्यांकडून उपक्रमाचे कौतुक
जमिनीवर, तळागाळात काम केले तर त्याचे सुंदर प्रतिबिंब समाजमनावर लगेचच उमटते. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यदेखील असेच स्वच्छ आणि पारदर्शी आहे, त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रावर या कार्याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. महाराष्ट्राला स्वच्छतेत अग्रेसर ठेवण्याचे कार्य या प्रतिष्ठानने केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली.
प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी एकाच दिवशी, एकाच वेळी राज्यातील १०० शहरांमध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात तीन लाख नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही विधायक उपक्रमात जनतेचा सहभाग आवश्यक असतो. लोकसहभागातून राबविलेली कोणतीही मोहीम कशी यशस्वी होते, याचा प्रत्यय आजच्या मोहिमेतून आला आहे.
जोवर आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता समाजात रुजत नाही तोवर स्मार्ट सिटीसारख्या संकल्पना अंमलात येणे अवघडच असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्रातील स्वच्छतादूत म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अप्पासाहेबांची नियुक्ती केली आहे.

महात्मा फुले मंडई परिसरात स्वच्छता
मुंबईत महात्मा फुले मंडईच्या परिसरातील स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री स्वत: उपस्थित होते. हातात झाडू घेऊन परिसराच्या सफाई मोहिमेतही ते जातीने सहभागी झाले. सुमारे ४० हजार नागरिकांच्या सहभागातून परिसराची स्वच्छता करण्याच्या या मोहिमेस महापालिकेकडून सक्रीय सहभाग मिळाला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अप्पासाहेब धर्माधिकारी, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, चित्रपट निर्माते सुभाष घई आदी उपस्थित होते.