गोरेगावात रहिवाशांचा मोर्चा

आरे वसाहतीला ‘वनक्षेत्र’ म्हणून घोषित करण्याविषयी हरित लवादाकडे करण्यात येत असलेल्या मागणीच्या विरोधात रविवारी गोरेगावातील आरे वसाहतीत ‘जन आधार सामाजिक प्रतिष्ठान’कडून स्थानिक रहिवाशांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आरे वसाहतीला वनक्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी काही संघटनांकडून हरितलवादाकडे करण्यात येत आहे.
आरे वसाहतीला वनक्षेत्र जाहीर केल्यास आरेतील आदिवासी बांधव व इतर झोपडीधारक रहिवाशी बेघर होण्याची शक्यता असून आरेच्या हद्दीवरील एसआरए गृहसंकुल, वनराई गृहसंकुल, दुधसागर गृहसंकुल इत्यादी ठिकाणच्या रहिवाशांनाही याची झळ पोहोचू शकते, अशी माहिती ‘जन आधार सामाजिक प्रतिष्ठान’चे अध्यक्ष नीलेश धुरी यांनी या वेळी दिली. मोर्चाबरोबरच याविषयी जनजागृती करण्यासाठी स्थानिक रहिवाशांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुमारे एक हजार स्थानिक रहिवासी उपस्थित होते. ‘जन आधार सामाजिक प्रतिष्ठान’कडून आरे वसाहतीतील वृक्षतोडीला आळा घालून स्थानिक झोपडीधारक रहिवाशांना ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तून मोफत घरे उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी गेल्या दीड वर्षांपासून ‘आरे वाचवा, घरे वाचवा’ ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दुग्धमंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्री तसेच सरकारच्या संबंधित विभागांकडे याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच समाजसेवक अण्णा हजारे यांनाही याविषयी पत्र पाठविले असून त्यांनी याबाबत चर्चा करण्यासाठी बोलाविले आहे, असे धुरी यांनी सांगितले.