तुटवडय़ाच्या भीतीने पहाटेपासून रांगा; साठय़ाबाबत यंत्रणाही अनभिज्ञ

मुंबई : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाद्वारे एक मेपासून देशातील करोना प्रतिबंधक मोहीम व्यापक स्वरूप धारण करत असली तरी, सध्या सुरू असलेला लसीकरण कार्यक्रमच अनिश्चिततेत अडकला आहे.  मुंबईला रविवारी मिळालेला कोव्हिशिल्ड दीड लाख लशीचा साठा मंगळवारीच संपल्यामुळे बुधवारी अनेक केंद्रांवर लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे लस घेण्यासाठी पहाटेपासून लशीच्या रांगेत उभ्या राहिलेल्यांनाही मात्रेविना परतावे लागले. दुसरीकडे, लशीच्या कुप्या संपत आल्या तरीही दुसऱ्या दिवशी किती लससाठा उपलब्ध होईल, याबाबत प्रशासनच अनभिज्ञ असल्याने एकूणच मोहिमेची अवस्था गोंधळाची आहे.

लशींचा साठा संपल्याने बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) लसीकरण केंद्रावरील लसीकरण स्थगित केले होते. त्यामुळे लस घेण्यासाठी विविध भागातून आलेल्या नागरिकांना लस न घेताच परतावे लागले. लस घेण्याकरिता सकाळी ८ पासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या. वाहतुकीवर निर्बंध असल्याने अनेकजण खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सीवर अधिकची पदरमोड करीत केंद्रावर आले होते. बीकेसी केंद्रात दरदिवशी सुमारे साडे पाच ते सहा हजार जणांचे लसीकरण केले जाते. परंतु लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण स्थगित केल्याचे नागरिकांना बुधवारी केंद्रावर आल्यावर समजले.  त्यामुळे नगरिक संतापले. केंद्रावर मालाड, अंधेरी, मालवणी, चेंबूर, शीव परिसरातून नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांना केंद्राच्या आत येऊच दिले नाही. त्यामुळे रस्त्यावर जमलेली गर्दी उन्हाचा तडाख्याने बेजार झाली होती. सकाळी ८ वाजता आलेले नागरिक ११ वाजेपर्यंत लस मिळेल या आशेवर केंद्रबाहेर ताटकळत थांबले होते.

वरळीतील राज्य विमा कामगार रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरही बुधवारी सकाळपासून नागरिकांची मोठी रांग लागली होती. लसीकरणासाठी या केंद्रावर सुमारे १ हजार नागरिक रांगेत उभे होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी होती. मात्र या केंद्रावरही ३९० नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल इतकाच लसींचा साठा उपलब्ध होता. परिणामी उर्वरित नागरिकांना माघारी पाठविण्याच्या सूचना डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे अनेकांना लसी न घेताच परतावे लागले.

सुट्टी वाया

अशा सावळ्या गोंधळाचा परिणाम कामावर होत असल्याचे जोसेफ यांनी सांगितले, ‘मी चेंबूर हून आलो आहे. तिथल्या लसीकरण केंद्रावर लस संपल्याने बऱ्याच लोकांनी बीकेसीला यायचा निर्णय घेतला. चेंबूरहून रिक्षा करून येथे आल्यावरही तीच अवस्था आहे. लसीकरणासाठी आज सुट्टी घेतली होती, ती वाया गेली, असे त्यांनी सांगितले.

नियोजनात अडचणी

मुंबईत दिवसाला एक लाख जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. परंतु साठा पुरेसा प्राप्त होत नसल्याने सर्व केंद्र कार्यान्वित करणे शक्य होत नाही. लशीचा साठा प्रत्येक केंद्रावर किती शिल्लक आहे, याची माहिती अहवाल तयार झाल्यावर रात्री उशीरा मिळते. तरी त्यातूनही कोणत्या केंद्रावर नसेल हे कळविण्याचा आमचा प्रयत्न असतो, परंतु लशीचा साठा इतका अनियमित आहे की आम्हालाही काही नियोजन करता येत नाही. पुढील साठा गुरुवारी येण्याची शक्यता आहे, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले

वेळ, पैसा खर्च

‘बीकेसी मध्ये लसी घेण्यासाठी येण्याची माझी तिसरी वेळ आहे. मात्र तिन्ही वेळा लस संपल्याने मला रिकाम्या हाती घरी परतावे लागले. आता या लसीकरण प्रक्रियेचाच वैताग आला आहे. उद्या लस मिळणार नसेल तर किमान आदल्या दिवशी कळवायची तसदी केंद्रांनी घ्यावी किंवा त्या दिवसाची वेळच देऊ नये,’ असे खेरवाडी येथील संपदा सुर्वे यांनी सांगितले. ‘मी व माझी  पत्नी सकाळी ८ वाजल्यापासून पासून रांगेत उभे आहोत. कुणीही नीट उत्तर देत नाही. मदतवाहिनीवर फोन करून या एवढे सांगून मोकळे झाले. पण लोकांना लांबून यायला किती त्रास होतो, त्यांचे पैसे, वेळ वाया जातो याचे भान प्रशासनाला असायला हवे,’ अशी नाराजी सहार वरून आलेल्या ब्रेस यांनी व्यक्त केली.

स्पष्ट माहिती देण्याची मागणी

अनेक केंद्रावर लोक सकाळपासून रांगा लावूनही त्यांना लस मिळत नाही. काही केंद्रावर लसीकरण रद्द केले जाते. तेव्हा लस उपलब्ध असेल तितक्याच नागरिकांना वेळ देण्यात यावी. लसीकरण रद्द झाल्यास आदल्या दिवशी संदेश पोहचवावा, जेणेकरून नागरिकांचा वेळे, पैसा वाया जाणार नाही. केंद्रावरही गर्दी होऊन करोनाची लागण होण्याचा धोका उद्भवणार नाही, अशी मागणी बीकेसीतील संतप्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.