प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्दय़ांवर प्रश्नांचा भडिमार

मुंबई : समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ‘मेट्रो ६’ प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आयोजित केलेल्या बैठकीत नागरिक, पर्यावरणप्रेमींनी विविध मुद्दय़ांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन सहा महिने झाल्यानंतर बैठक बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच या प्रकल्पासाठी होणारी वृक्षतोड, बाधित घरांची संख्या आणि रात्रीचे ध्वनिप्रदूषण याबाबत नागरिकांनी अनेक आक्षेप नोंदवले.

‘मेट्रो ६’च्या १४.८ किलोमीटर लांब मार्गिकेच्या अनुषंगाने पर्यावरणावर होणारे परिणाम आणि सामाजिक परिणाम मूल्यांकन याबद्दल नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांना माहिती देण्यासाठी व सूचना स्वीकारण्यासाठी या प्राथमिक बैठकीचे आयोजन प्राधिकरणाने केले होते. ही बैठक केवळ सूचना स्वीकारण्यापुरतीच आहे, अशी भूमिका प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून घेतली होती. पण मुळातच या मार्गिकेवर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर रस्त्याच्या मध्ये दोहो बाजूंनी रस्तारोधक लावले असून काही ठिकाणी कामाची सुरुवातदेखील झाली आहे, असा आरोप बैठकीत करण्यात आला.

पर्यावरणतज्ज्ञ डी. स्टालिन यांच्या वृक्षांसंबंधित प्रश्नावर, प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मार्गिकेच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी ८९९ वृक्षांचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. तिसऱ्या व अंतिम टप्प्यात किती वृक्षांना फटका बसेल याची आकडेवारी अजून अंतिम झालेली नाही. मेट्रो ६चे कारशेड सुरुवातीस कांजूरमार्ग पश्चिमेस होणार होते, पण आता ती जागा बदलून कांजूरमार्ग पूर्वेची जागा प्रस्तावित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर डी स्टालिन यांनी मेट्रो ३ च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग पूर्वेकडील जागेचा प्रस्ताव यापूर्वी नाकारला होता, पण मेट्रो ६ साठी हा प्रस्ताव कसा काय स्वीकारण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला.

सदर मार्गिकेवर सध्या काम सुरू असून रात्रीदेखील काम सुरू असल्याची तक्रार पवई येथील रहिवासी हनुमान त्रिपाठी यांनी केली. त्यामुळे या मार्गिकेवरील लोकांच्या झोपेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडचे काम पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली असताना आता पुन्हा मेट्रोसाठी हा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे अनेक नागरिकांनी नमूद केले. मार्गिकेवरील प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण अजून झाले नसून त्यास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर संबंधितांशी बोलून मग पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. मात्र ही सर्व प्रक्रियाच संदिग्ध असल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षांत मुलांच्या प्रवेशाबाबत काय निर्णय घ्यायचा याचा संभ्रम असल्याचे प्रकल्पबाधित मिलिंदनगरमधील मिलिंद सोनपसारे यांनी सांगितले.

अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळणे, स्वीकारलेल्या सूचनांवर प्राधिकरण काय निर्णय घेणार याविषयी ठोस उत्तर न मिळणे यामुळे नागरिकांच्या प्रतिक्रिया संतप्त होत्या. दिल्ली मेट्रोचे प्रकल्प संचालक पी. के. शर्मा यांनी तांत्रिक प्रश्नांना उत्तरे दिली, तर प्राधिकरणाचे सामाजिक परिणाम मुख्य अधिकारी विश्राम पाटील यांनी सामाजिक परिणामावर माहिती दिली.

रहिवाशांचे आक्षेप

’ ८९९ झाडांची तोड

’ रात्रीचे ध्वनिप्रदूषण

’ धुळीचे प्रदूषण

’ मार्गिकेचे काम सुरू होऊनही प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण नाही