शैलजा तिवले
परदेशात मान्यता नसल्यामुळे साशंकता
मुंबई : पालिकेने गेल्या आठवड्यापासून कोव्हॅक्सिन पहिल्या मात्रेसाठी उपलब्ध के ले असले तरी परदेशात या लशीला मान्यता न मिळाल्यामुळे अनेकांनी ही लस घेण्याकडे पाठ फिरविली आहे. ‘कोविशिल्ड’ लस घेण्याकडेच कल अधिक आहे.

लसीकरण सुरू झाले त्यावेळी कोविशिल्डला अधिक प्रतिसाद होता. त्या तुलनेत कोव्हॅक्सिनला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे याचे लसीकरण फारसे होत नव्हते. दरम्यान कोव्हॅक्सिनमुळे दुष्परिणामही फारसे होत नसल्यामुळे या लशीची मागणी वाढत गेली. लस तुटवड्यानंतर अनेकांनी अगदी खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन ही लस घेतली. एप्रिलनंतर प्रथमच पालिकेला मोठ्या प्रमाणात कोव्हॅक्सिनचा साठा मिळाला असून दुसरी मात्रा घेण्यास पात्र नागरिक फार कमी आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिन पहिल्या मात्रेसाठी उपलब्ध के ले आहे. परंतु ही लस घेण्यासाठी नागरिक फारसे उत्सुक नाहीत असे आढळले आहे.

पालिकेला गेल्या आठवड्यात आलेल्या लशींमध्ये ४० हजार कोव्हॅक्सिनच्या मात्रा आल्या आहेत. पालिकेने १२ जुलैपासून २८ केंद्रावर प्रत्येकी १०० मात्रा देऊन पहिली मात्रा देण्यास सुरुवात केली आहे. यात पहिल्या दिवशी केवळ २१० जणांनी या लशीची पहिली मात्रा घेतली तर कोविशिल्डची पहिली मात्रा ३३,९३२ जणांनी घेतली.

‘आमच्याकडे येणाऱ्या नागरिकांना आम्ही दोन्ही लशी उपलब्ध असल्याचे सांगतो. बहुतांश नागरिक कोविशिल्डच देण्याचा आग्रह करतात. कोव्हॅक्सिनला परदेशात मान्यता नसल्यामुळे ही लस प्रभावी आहे का अशी शंकाही अनेकांकडून उपस्थित केली जाते. उपलब्ध असूनही कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे’, असे बीकेसीच्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा खुली करून आठवडा उलटला तरी अजूनही प्रतिसाद अत्यल्पच आहे. शनिवारी (१७ जुलै) १५ हजार जणांनी कोविशिल्डची पहिली मात्रा घेतली आहे तर कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या ३३२ होती.

लशीच्या पुरवठ्याबाबत शंका

कोव्हॅक्सिन लस मुळातच कमी येते आणि त्यात मोजक्याच ठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे दुसरी मात्रा मिळण्यात अडचण येऊ नये म्हणूनही काही जण कोविशिल्डला प्राधान्य देत असल्याचे सांगतात. तर काही जण सांगतात की कोविशिल्डची दुसरी मात्रा अगदीच मिळाली नाही तर किमान ८०० रुपयांत खासगीमध्ये मिळते. कोव्हॅक्सिनचे खासगी रुग्णालयात दर अधिक आहेत, अशी माहिती कुपर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दिली.

खासगी केंद्रामध्येही तुलनेने कमी मागणी

खासगी केंद्रामध्ये प्रतिदिन जवळपास २५ ते ३० हजार जण लशीची पहिली मात्रा घेतात. यात कोव्हॅक्सिनची पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या दीड हजार आहे. पालिकेच्या तुलनेत अधिक असली तरी एकूण लशीच्या मागणीत हे प्रमाण कमीच आहे.