वरळी-शिवडी उन्नत मार्गाबद्दल नागरिकांच्या बैठकीतील सूर

मुंबई : अतिशय दाटीवाटीच्या लोकवस्तीतून प्रस्तावित असलेल्या शिवडी-वरळी उन्नत मार्गामुळे परळ, शिवडी भागातील रहिवाशांना विस्थापित व्हावे लागेल की काय, अशी भीती मंगळवारी या प्रकल्पाच्या नागरिकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. ‘महाराष्ट्र सागरी किनारा विभाग प्राधिकरणा’च्या सूचनेवरून ही बैठक घेण्यात आली होती. नागरिकांच्या या बैठकीत पर्यावरणापेक्षा या मार्गावरील रहिवाशांचा आणि भविष्यात उन्नत मार्गाखालील रस्ता अरुंद होण्याचा विषय अधिक चर्चेत राहिला.

मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी कमी करणारा साडेचार किमीचा वरळी-शिवडी उन्नत मार्ग ‘मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणा’द्वारे प्रस्तावित आहे. या मार्गाच्या वरळीच्या बाजूस १८३ मीटर आणि शिवडीच्या बाजूस २५५.६ मीटर बांधकामाचा भाग ‘सागरी हद्द नियंत्रण कायद्या’अंतर्गत प्रवर्ग २ मध्ये (सीआरझेड २) येतो. ‘महाराष्ट्र सागरी किनारा विभाग प्राधिकरणा’च्या जानेवारी २०१४च्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर २०१९ च्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर वरळी येथील रहिवाशांचे आक्षेप मागवण्यात आले. त्यावर मंगळवारी एमएमआरडीएच्या कार्यालयात बैठक झाली. एमएमआरडीएकडे केवळ तीन आक्षेप आले होते. मात्र उन्नत मार्ग परिसरातील नागरिकांनी विस्थापन आणि भविष्यात रस्ता अरुंद होण्यावरदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले.

बैठकीच्या सुरुवातीस पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल एमएमआरडीएने सादर केला. त्यासाठी आधारभूत धरलेली हवेच्या पातळीची माहिती आणि त्यानुसार केलेले मूल्यांकन यावर नागरिकांनी आक्षेप घेतले. हे मूल्यांकन करताना रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असेल असे अपेक्षित धरण्यात आले आहे. मात्र हा उन्नत मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडला जोडण्यात येणार असून त्याचा लाभ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी होणार असेल तर रात्रीच्या वेळी उन्नत मार्गावरील वाहतूक कमी होणे कठीण असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

मडके बुवा चौक आणि जगन्नाथ भातणकर मार्ग परिसरातील नागरिक संघाच्या वतीने दामजीभाई गांगल यांनी पुनर्वसनाच्या प्रश्नावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास स्पष्टीकरण विचारले. त्यावेळी प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी उन्नत मार्गासाठी कोणतीही खासगी जागा ताब्यात घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी पुनर्वसनाच्या मुद्दय़ांवर रहिवाशांशी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चर्चा केली जाईल असे सांगितले. त्यामुळे यामध्ये संदिग्धता निर्माण होत असल्याचे गांगल यांनी सांगितले. एमएमआरडीए या प्रकल्पाबाबत वारंवार वेगवेगळ्या बाबी सांगत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी उन्नत मार्ग दोन खांबांवर असल्यामुळे खालील रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस अडथळा येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

सीआरझेडचे प्रश्न मर्यादित

‘कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्ट’ या संस्थेच्या वतीने शिवडी येथील सागरी किनारा हद्द नियंत्रण सागरी किनारा भागाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या हद्दीत शिवडीकडील बांधकाम येत असल्याचा आक्षेप सादर करण्यात आला होता. त्यावर सविस्तर उत्तर प्रश्नकर्त्यांना स्वतंत्रपणे दिले जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. झोरु भथेना यांनी वरळीकडील बाजूस मार्गाच्या आखणीतील त्रुटींवर आक्षेप घेतला. शिवडी-वरळी उन्नत मार्ग वरळीकडील बाजूस नरिमन पॉइन्ट ते वांद्रे-वरळी सेतू सागरी मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू या दोन्ही मार्गाना जोडला जाणार आहे. उन्नत मार्गाची या दोन्ही मार्गास होणारी जोडणी सदोषरीत्या करण्यात आल्याचा आक्षेप भथेना यांनी मांडला. त्यामुळे या परिसरात आणखीनच वाहतूक कोंडी होऊन प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होईल असे ते म्हणाले.

रुग्णवाहिकांना अडथळा?

उन्नत मार्ग आखणीच्या व्यवहार्यतेवर देखील आक्षेप घेण्यात आले. दादर येथील रहिवासी रोहित कात्रे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून परळ भागात असलेल्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांना सध्या होत असलेल्या अडथळ्यांबाबत जाणीव करून दिली. उन्नत मार्गावरून या परिसरात उतरणाऱ्या मार्गिकेची रचना असती तर रुग्णवाहिकांसाठी सुकर ठरले असते असे कात्रे यांनी सांगितले. पण तशी रचना आरेखनात नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नकाशावर मार्गिका दाखवताना सांगितले.