दुचाकी बाजारात अचानक तेजी; कर्जावर वाहनखरेदीकडे कल

अमर सदाशिव शैला,नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : मागील दोन वर्षांपासून मंदी असलेल्या दुचाकी वाहनांच्या बाजारात करोनामुळे चैतन्य आल्याचे चित्र आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या वापरात मर्यादा आणि करोना संसर्गाचा धोका दोन्ही असल्याने नागरिकांकडून खासगी गाडय़ांच्या वापरावर भर दिला जात आहे. त्यातही स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून सर्वसामान्य नागरिकांकडून दुचाकी वाहनांची खरेदी होते आहे. बहुतांश खरेदीदार कर्जावर गाडी घेणारा आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

करोनाचे संकट अद्यापही टळले नसल्याने बसमधून प्रवास करणे धोकादायक आहे, तर रेल्वेतून खासगी नोकरदारांना प्रवासाची मुभा नाही. त्यातच टॅक्सी आणि रिक्षाची सेवा अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी सुरक्षित असा पर्याय म्हणून दुचाकी खरेदीकडे नागरिकांचा ओढा आहे. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आला नसताना दुचाकींची मागणी वाढल्याने या क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

‘सध्या दुचाकी घेण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. टाळेबंदीआधी जितक्या दुचाकी गाडय़ांची विक्री होत असे, सद्य:स्थितीत तेवढय़ाच गाडय़ांची विक्री होत आहे. मात्र दुचाकींची विचारणा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कर्जावर गाडी घेणाऱ्यांचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे. तर आधीचे थकीत कर्ज, कागदपत्रांतील त्रुटी यांमुळे दुचाकी घेण्यात विघ्न येऊन अनेकांना माघारी जावे लागत आहे,’ अशी माहिती कुल्र्यातील ‘नेक्स्टजेन ऑटो’चे मोहम्मद हलीम शेख यांनी सांगितले.

दुचाकी खरेदी करणाऱ्यांपैकी ९० टक्के व्यक्ती कर्जावर गाडी घेत आहेत. वित्तपुरवठा कंपनीत कमीत कमी रक्कम अदा करून कर्जावर गाडी घेणाऱ्यांचे प्रमाण या महिन्यात तुलनेने अधिक आहे, अशी माहिती फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याने दिली. उमेशकुमार शर्मा हे ‘एमआर’चे काम करतात. त्यांचे फिरतीचे काम असल्याने सद्य:स्थितीत दुचाकीचा पर्याय सर्वाधिक सोयीस्कर आहे, असे शर्मा सांगतात.

‘ग्रामीण भागात दुचाकी वाहनांना ८० ते ९० टक्के मागणी आहे, तर शहरी भागात अद्यापही काही निर्बंध असल्याने ६० ते ७० टक्के मागणी आहे. त्यात करोनाची लस अद्यापही बाजारात आली नसल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दुचाकींना आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे,

– आशीष काळे, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन