नागरिक मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयांमध्ये कामे घेऊन गर्दी करतात. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे न लागता घरपोच सुविधा मिळाव्यात, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते २३ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र तसेच देशातील विविध राज्यांच्या माहिती तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

राज्य व केंद्राच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातर्फे ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या वेळी ठाकरे म्हणाले, ई-गव्हर्नन्स म्हणजे केवळ इलेक्ट्रानिक गव्हर्नन्स न ठरता जीवन सुलभ बनविण्यासाठीचे साधन ठरावे. तंत्रज्ञानामुळे समाजातील विषमता नाहीशी होण्यासही हातभार लागत आहे. तंत्रज्ञान हे जात-पात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्वाना समान सेवा देणारे माध्यम आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील परस्पर संवाद वाढून प्रशासनास त्याचा फायदा होतो.

मुंबई महानगरपालिकेने ‘बी एम सी ऑन ट्विटर’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून याचा प्रत्यय घेतला आहे. मुंबई ही ज्याप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी आहे, त्याचप्रमाणे ती लवकरच फिनटेक उद्योगांचीही राजधानी बनेल असा विश्वासही ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केला.

शासनामार्फत लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू करण्यात आला आहे व असे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. याबाबतचे धोरण राज्य शासन लवकर जाहीर करणार आहे. शासनाने विविध विभागांद्वारे ब्लॉक चेन तंत्रज्ञानाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रणालीसाठी एक sandbox तयार केला आहे. ‘महाशृंखला’ अशा नावाने तयार केलेल्या या प्रणालीचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.