मुख्यमंत्री ठाकरे-आंबेडकर भेटीत चर्चा
केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा व नागरिक नोंदणीचा फक्त मुस्लीम धर्मीयांवर परिणाम होईल, असा प्रचार केला जातो, परंतु नागरिकत्वाचे पुरावे देण्यास असमर्थ ठरतील, अशा हिंदू धर्मातील ४० टक्के समाजावर त्याचा परिणाम होणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.
नागरिकत्व कायदा व नागरिक नोंदणीच्या विरोधात वंचित आघाडी व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने २६ डिसेंबर रोजी दादर खोदादाद सर्कल येथे धरणे आंदोलन करण्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. त्या संदर्भात मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यात आघाडीचे नियोजित आंदोलन शांततेत करावे, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या वेळी आमदार कपिल पाटील, आघाडीचे धनराज वंजारी, डॉ. अरुण सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे ४० टक्के हिंदू भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही त्याचा फटका बसणार आहे. त्याचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात स्थानबद्धता छावणी उभारली जात आहे, हे आपण तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते, त्याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. त्याचबरोबरच अन्य काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2019 12:59 am