प्रसाद रावकर

अग्नितांडवात वरचे दोन मजले खाक झालेला मुंबई सेंट्रल-ताडदेव परिसरातील सिटी सेंटर मॉल पुन्हा सुरू करण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र अग्निशमन दलाने रद्द केलेले ‘ना हरकत’ प्रमाणपत्र आणि आता गाळेधारकांच्या संघटनेने सादर केलेल्या संरचनात्मक तपासणी अहवालातील त्रुटी मोठा अडथळा बनल्या आहेत. या अहवालाची पालिका पातळीवर तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे तूर्तास हा मॉल बंदच राहण्याची चिन्हे आहेत.

सिटी सेंटर मॉलमध्ये २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८.५३ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या अक्राळविक्राळ ज्वाळा आणि धुराचे साम्राज्य यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मॉलमध्ये मोठय़ा प्रमाणावर मोबाइल विक्री आणि दुरुस्तीची दुकाने होती. तसेच काही दुकानांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरचा मोठय़ा प्रमाणावर साठा करण्यात आला होता. त्यामुळे आगीने उग्र रूप धारण करत मॉलमधील दुसरा व तिसरा मजला गिळंकृत केला.

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दल आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यात मॉलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अग्निशमन दलाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द केले, तर मॉलमधील सुमारे २०० अनधिकृत गाळे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने जमीनदोस्त केले.

मॉल लवकरात लवकर सुरू व्हावा या दृष्टीने गाळेधारकांची धावपळ सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मॉलमधील गाळेधारकांच्या संघटनेने गेल्या सोमवारी इमारतीच्या संरचनात्मक तपासणीचा अहवाल पालिकेला सादर केला आहे. मात्र या अहवालात त्रुटी असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मॉलचा तळमजला आणि पहिला मजला चांगल्या स्थितीत आहे. मात्र आगीत भस्मसात झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील धोकादायक भाग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी अहवालात कोणत्याही उपाययोजना सुचविण्यात आलेल्या नाहीत; किंबहुना या दोन मजल्यांबाबत कोणताच उल्लेख नाही. मॉलची संपूर्ण इमारत पाडून बांधणार की धोकादायक भागाची दुरुस्ती करणार याचाही अहवालात उल्लेख नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ मॉलमधील तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील गाळे सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही. संघटनेने सादर केलेल्या अहवालाची पालिकेमार्फत तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

गाळेधारकांच्या संघटनेने मॉलच्या इमारतीचा संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला आहे. त्यात काही त्रुटी आहेत. त्यामुळे अहवालाची तपासणी करण्यात येत आहे. या मॉलबाबत पालिकेच्या संबंधित विभागांकडून आवश्यक तो सल्ला घेऊनच पुढील कारवाई करावी लागेल. मॉल सुरू करण्यासाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र अटी-शर्ती पूर्ण करून पुन्हा घ्यावे लागेल.

– प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग