मुंबईतल्या वर्सोवा येथे राहणाऱया २६ वर्षीय नर्तिकेवर हैद्राबादला नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधेरी येथे राहणारी ही तरुणी नर्तिका आहे. तिला हैद्राबाद येथे ३१ डिसेंबरच्या रात्री एका कार्यक्रमात नृत्य सादर करण्याचे काम मिळाले होते. एका इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीने तिला हे काम मिळवून दिले होते. त्याप्रमाणे ३१ डिसेंबरला ती विमानाने हैद्राबादला गेली. तेथे चार व्यक्ती तिला भेटल्या. या चौघांनी एका हॉटेलात नेले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. २ जानेवारी रोजी तिला शुद्ध आली तेव्हा ती मुंबईत जाणाऱ्या बसमध्ये बसली होती. तिच्याकडील क्रेडीट कार्ड, पैसे आणि दागिनेही लंपास झाल्याचे आढळले.
या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात ही तरूणी गेली असता, कायद्यानुसार हैदराबादमध्ये तक्रार दाखल करावी लागेल असे सांगत मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला होता. यानंतर जनशक्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर मंगळवारी वर्सोवा पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली. पीडितेच्या जबाबानुसार, नववर्षाच्या सेलिब्रेशन निमित्त कार्य़क्रम आयोजित केला असल्याचे सांगून चार जणांनी एक लाख रूपये मानधन देण्याचे सांगितले होते. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी विमानाने पीडिता हैदराबादसाठी रवाना झाली तेथे एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर रात्री दहा वाजता कार्यक्रम असल्याचे सांगून तिला तयार राहण्यास सांगितले गेले. दरम्यान, एका शीतपेयांतून गूंगीचे औषध देण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानंतर थेट २ जानेवारी रोजी शुद्ध आली तेव्हा ही तरुणी बोरीवली येथे एका खासगी बसमध्ये होती.