मुंबापुरीमध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेश आगमनाच्या तयारीत भाविक व्यक्त असताना पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खोदलेल्या खड्डय़ांची मोजणी करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. तसेच खड्डय़ांची नोंदणी करण्यात येत असून गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा आढावा घेऊन मंडपासाठी खोदलेला रस्ता पूर्ववत न करणाऱ्या मंडळांकडूून प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी काही मंडळे इमारतीत, चाळी, मैदाने आणि खासगी जागेत गणेशोत्सव साजरा करतात. काही मंडळे वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा बेताने मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. या मंडळांनी रस्त्यांमध्ये खड्डे खोदून मंडप उभारले आहेत. तसेच वाहतुकीचा रस्ता असलेल्या छोटय़ा गल्ल्यांमध्येही मंडप उभारण्यात आले आहेत. त्यासाठी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर खड्डे खोदण्यात आले आहेत. पालिकेने गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. आता मंडपांसाठी खड्डे खोदण्यात आल्यामुळे रस्ता खडबडीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडप उभारणीसाठी परवानगी देताना खोदलेले खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत करण्याची अट पालिकेने घातली आहे.

पालिकेकडून परवानगी मिळताच अनेक मंडळांनी मंडप उभारले. मंडप उभे राहिल्यानंतर पालिका प्रशासनाने मंडपासाठी खोदलेल्या खड्डय़ांची पाहणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या परिरक्षण विभागातील अभियंते विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मंडपांची पाहणी करीत असून मंडळांनी खोदलेल्या खड्डय़ांची संख्याही नोंदवून घेण्यात येत आहे.

गणेशोत्सवानंतर मंडप उतरविल्यानंतर मंडळांकडून खड्डे बुजविण्यात येतात की नाही याचा फेरआढावा घेण्यात येणार आहे.

मंडपासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांची मोजणी करण्यापूर्वी पालिकेने पावसाच्या तडाख्यात पडलेल्या खड्डय़ांकडे पाहावे, अशी प्रतिक्रिया बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.