तीन जिल्ह्य़ांत ६०० वनराई बंधारे बांधणार; आपद्ग्रस्त कुटुंबियांना वर्षभर धान्यपुरवठाही

ज्या समाजाने आपल्याला चांगले शिक्षण दिले.. चांगली नोकरी दिली.. सन्मान दिला.. त्याच आज संकटात असलेल्या समाजाचे दु:खाश्रू पुसण्यासाठी.. संकटात सापडलेल्या बळीराजाला उन्हा उभे करण्यासाठी राज्यातील काही आजी-माजी जेष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांना दत्तक घेऊन तेथील शेतकऱ्यांना पुन्हा अकदा स्वाभिमानी बनविण्याचा निर्धार या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याची सुरूवात म्हणून पावसाळा संपताच या तीन जिल्ह्य़ात ६०० वनराई बंधारे बांधण्यात येणार असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभर धान्य पुरवठा करण्याचा निर्णयही या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दुष्काळाच्या चक्रव्युहात सापडलेल्या आणि दारिद्रय पाचविला पुजलेल्या मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्य़ामध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सर्वाच्याच चिंतेचा विषय आहे. राज्य सरकार बरोबरच काही स्वयंसेवी संस्थाही आपापल्या पद्धतीने सकंटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी दुष्काळी भागात प्रयत्नशील आहेत. पण कोणाला दोष देण्यापेक्षा किंवा सरकारला नावे ठेवण्यापेक्षा आपणही या राज्याप्रती काही देणे लागतो याचा विचार करून प्रशासनातील आजी-माजी अधिकारी आणि काही समाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या तीन जिल्ह्य़ात पाणी, शेती आणि शिक्षण क्षेत्रातील विकासासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड, माजी अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनाईक यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या संस्थेत आता अप्पर मुख्य सचिव सुमित मलिक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर, बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील, मिलिंद भारंबे, कृष्ण प्रकाश या अधिकाऱ्यांसह अभिनेत्री निशिगंधा वाड, श्र्दधा बेलसरे, अ‍ॅड. केतन गाला, व्यंकटेश कुलकर्णी आदी सहभागी झाले असून सर्वानी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली आहे. राज्यातील आजी-माजी  सनदी तसेच पोलिस सेवेतील अनेक अधिकारीही या संस्थेत सहभागी होत आहेत. या संस्थेच्या काही सदस्यांनी दुष्काळी जिल्ह्य़ांचा दौरा करून थेट शेतकऱ्यांशी संवाध साधून त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. त्यानुसार आता योजनांची आखणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्य़ाची जबाबदारी रत्नाकर गायकवाड यांच्यांवर, उस्मानाबादची विवेक फणसळकर यांच्यावर तर लातूरची जबाबदारी अरूप पटनाईक आणि आनंद कुलकर्णी यांच्यासवर सोपविण्यात आली आहे. लातूर जिल्ह्य़ातील औसा तालुक्यातील हसनगला या गावात पाण्याते तीव्र दुर्भिक्ष पाहून या संस्थेने हे गावच दत्तक घेतले. एवढय़ावरच न थांबता अभिनेत्री रेखा, खासदार राजीव शुक्ला यांनाही या उपक्रमाची कल्पना देण्यात आली तेव्हा दोघांनी आपल्या खासदार निधीतून प्रत्येकी ५० लाख रूपये या गावासाठी निधी दिला असून त्यातून गावाचा पाण्याचा आराखडा तयार करून पाणी पुरवठा योजनाही हाती घेण्यात आली आहे. अशाच प्रकारे पावसाळा संपताच या तिन जिल्ह्य़ात सुमारे ६०० नाला बंधारे बांधण्यात येणार असून त्याचे नियोजन अंतिम टप्यात आहे.