युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मरिनड्राईव्ह येथे साकारलेल्या खुल्या जिमच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रस्ते आणि पदपथ हे लोकांना चालण्यासाठी असतात. महापालिका पदपथावरील फेरीवाल्यांना हटवते, मग या जिमलाच वेगळा न्याय का, असा सवाल करत नितेश राणेंनी या जिमवर कारवाई करण्याची मागणी केली. पालिकेला ही जिम हटविता येत नसेल तर आम्हाला सांगावे, आम्ही समर्थ आहोत, असेही नितेश राणे यांनी म्हटले. त्यानंतर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेत हिंमत  असेल तर ओपन जिमला हात लावून दाखवा, असे खुले आव्हान नितेश राणे यांना दिले. नितेश राणे ही जिम हटवायची भाषा करत असतील तर, वेळ आणि तारीख सांगा, आम्ही तयार आहोत, असे मरिनड्राईव्ह येथील शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्याकडून सांगण्यात आले. चांगल्या कामाला नावे ठेवायची, ही काँग्रेसची संस्कृतीच आहे. त्यामुळे नितेश राणे तीच संस्कृती जोपासत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील जिम संबंधित कंपनीने परवानगी क्षेत्राबाहेर उभारल्याने पालिकेने त्यावर गुरुवारी कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर गैरसमजुतीतून ही कारवाई झाल्याचे सांगत पालिकेने पुन्हा एकदा खुली व्यायामशाळा आहे त्याच जागेवर उभारण्यास परवानगी दिली.
पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या परवानगीच्या आधारे डी. एम. फिटनेस कंपनीने गेल्या आठवडय़ात मरिन ड्राइव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर दोन ठिकाणी या जिम उभारल्या. पण आयत्या वेळी जागा बदलून एक जिम पोलीस मैदानासमोर उभारण्यात आली. मात्र, हा भाग पालिकेच्या सी विभागात येतो. त्यामुळे फक्त ए विभागात खुली जिम उघडण्याची परवानगी असताना ही जिम ‘सी’ विभागात उभारणे अनधिकृत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.