रत्नागिरी जिल्ह्यात कार्यक्रम असताना निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदार म्हणून प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे नाव टाळण्याची जलसंपदा खात्याची चूकच झाली, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी तटकरे यांनाच दोष दिला. नांदेडचे संपर्कमंत्री म्हणून पक्षवाढीसाठी तेथे कधी जात नाहीत, पण रत्नागिरीमध्ये ऊठसूठ येण्याचे कारण काय, असा सवालच जाधव यांनी तटकरे यांना उद्देशून केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जलसंपदा खात्याच्या वतीने गेल्या आठवडय़ात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजशिष्टाचार विभागाने निमंत्रण प्रत्रिकेत कोणाची नावे छापावीत याचे नियम केले आहेत. तरीही गुहागरचे आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे नाव टाळल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी तटकरे यांच्यावरच तोंडसुख घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातून विस्तवही जात नाही. यापूर्वीही उभयतांमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करताना अनुमोदन देण्याची जबाबदारी तटकरे यांच्यावर सोपविण्यात आली होती.
प्रदेशाध्यक्षपदी जाधव यांची निवड झाल्यावर पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. यामुळेच पक्षाध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. तसेच जाहिरात किंवा निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार जाधव यांचे नाव छापण्याचे टाळून तटकरे यांच्याकडील जलसंपदा विभागाने चूकच केली, अशी कबुलीही मलिक यांनी दिली.
प्रदेशाध्यक्षही घसरले
तटकरे यांनी पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न केले, असा सवाल करतानाच, त्यांनी फक्त घरातच पक्ष वाढविला, असा थेट हल्ला भास्कर जाधव यांनी चढविला. स्वत: तटकरे मंत्री, भाऊ आमदार, मुलगा नगराध्यक्ष तर मुलगी युवती काँग्रेसची पदाधिकारी अशी गोतावळ राजकारणात आणली आहे. नांदेडचे संपर्कमंत्री असताना तेथे जाण्याचे का टाळतात, असा सवालही जाधव यांनी केला. वास्तविक प्रदेशाध्यक्ष पातळीवरील नेत्याने स्वपक्षीय मंत्र्याच्या विरोधात मतप्रदर्शन करताना खबरदारी घेणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्ये उमटली आहे. तटकरे यांनी सारे जाणिवपूर्वक घडवून आणल्याचा जाधव यांचा आक्षेप आहे. प्रदेशाध्यक्ष विरुद्ध मंत्र्यांमधील भांडण पक्षासाठी हितकारक नाही, असे पक्षाचे नेते बोलू लागले आहेत.