शिवसेना भवनाजवळील घटना; अयोध्येतील जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरून वादंग

मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या कथित जमीन गैरव्यवहारावर टीका करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर मोर्चा काढला. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

अयोध्येतील राम मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागल्याने या प्रकरणी चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या भूमिके मुळे संतापलेल्या ‘भाजयुमो’ने मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली दादरमधील शिवसेना भवनवर ‘फटकार मोर्चा’ काढला होता. शिवसेना भवनवर मोर्चा येणार, हे समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासहअनेक महिला शिवसैनिकही हजर होत्या. या आंदोलनातून काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सावधगिरी बाळगत ‘भाजयुमो’चा मोर्चा शिवसेना भवनपासून काही अंतरावरच अडवला. ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी मोर्चा पुढे नेऊ द्यावा, असा प्रयत्न के ला. काही जणांनी रस्त्यावर ठाण मांडत घोषणाबाजी सुरू के ली, तसेच ‘सोनिया सेना’ असे फलकही झळकवले.

‘भाजयुमो’च्या आंदोलकांना अटक करून पोलीस गाड्यांमधून नेत असतानाच्या गडबडीत काही मोर्चेकरी पोलिसांचे अडथळे झुगारून शिवसेना भवनच्या दिशेने आल्याचे वृत्त पसरले आणि शिवसैनिक त्या दिशेने धावले. त्यावेळी ‘भाजयुमो’चे मोर्चेकरी आणि शिवसैनिकांत हाणामारी झाली. यात अनेक मोर्चेकऱ्यांना दुखापत झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मागे सारल्याने मोठा अनर्थ टळला. शिवसैनिकांनी मोर्चेकऱ्यांवर हल्ला के ल्याचा आरोप आंदोलक करत होते. ‘‘शांतपणे मोर्चा व आंदोलन सुरू होते व पोलीस आम्हाला अटक करून नेत होते. पण शिवसैनिकांनी मोर्चामधील महिलांवर व माझ्यावर हल्ला के ला. माझ्या पोटावर लाथा मारल्या’’ असा आरोप ‘भाजयुमो’च्या अक्षता तेंडुलकर यांनी के ला. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महिलांवर हल्ला करण्यासाठी शिवसैनिक पाठवले हे लज्जास्पद आहे, अशी टीकाही तेंडुलकर यांनी के ली. नंतर तेंडुलकर यांनी माहीम पोलीस ठाण्यात श्रद्धा जाधव व इतर शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल के ली.

श्रद्धा जाधव यांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. आम्ही शिवसेना भवनच्या रक्षणासाठी जमलो होतो. आम्ही कोणावरही हल्ला केलेला नाही. अक्षता तेंडुलकर यांच्यावर हल्ला करायला कोणी गेले नव्हते. त्या आंदोलन करत खाली बसल्या होत्या. उलट त्याच नंतर उठून आरडाओरड करत होत्या. मी किं वा कोणत्याही शिवसैनिकाने तेंडुलकर यांना मारहाण के लेली नाही, असे श्रद्धा जाधव यांनी सांगितले. तसेच राज्यातील सत्ता गेल्याने पाण्याबाहेरील माशाप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते तडफडत आहेत. सरकार पडत नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे व त्यातूनच त्यांना हा सारा बनाव केल्याचा आरोप जाधव यांनी केला.

दोन गुन्हे

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमधील हाणामारीप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले. करोना नियमांचे पालन न केल्याबद्दल ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दंगल, हाणामारी, विनयभंग, जबरी चोरीचा गुन्हा सात जणांविरोधात नोंदवण्यात आला. याबाबत शिवाजी पार्क पोलीस कारवाई करत आहेत.

आरोप-प्रत्यारोप

शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याप्रकरणी चौकशी करून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी भाजपने केली. या प्रकारानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अँड. आशीष शेलार यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दुसरीकडे, शिवसैनिकांनी मोर्चेकऱ्यांवर हल्ला के ल्याचा आरोप आमदार सदा सरवणकर यांनीही फे टाळला. भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनवर हल्ला करणार असल्याचे समजल्याने आम्ही त्याच्या रक्षणासाठी थांबलो होतो. मोर्चेकरी हल्ला करत असल्याचे दिसल्याने काही जण त्यांना रोखण्यासाठी गेले. हल्ला करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर दिले. पण, शिवसैनिकांनी कोणावरही स्वत:हून हल्ला के लेला नाही, असे सरवणकर यांनी सांगितले.