प्रशासकीय विलंबाचा पालिका शाळांतील शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांना फटका

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

दोन महिन्यांवर (फेब्रुवारी) आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या पालिका शाळांमधील इयत्ता पाचवी आणि आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी आता ‘विद्यार्थी मार्गदर्शिका संच’ खरेदी करण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला आहे. मात्र संबंधित समितीची मंजुरी आणि खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन मार्गदर्शिका संच विद्यार्थ्यांच्या हाती पडण्यास जानेवारीचा दुसरा पंधरवडा उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संचाचा वापर करून विद्यार्थी अभ्यास कधी करणार, असा प्रश्न आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. पालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली असून २०१७ मध्ये पाचवी व आठवीचे ९९, २०१८ मध्ये २०९, तर २०१९ मध्ये २३९ विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. तथापि, पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खासगी प्रकाशनाचे पुस्तक संच खरेदी करण्याची ऐपत या विद्यार्थ्यांची नाही. ही बाब लक्षात घेत परिषदेने प्रसिद्ध केलेले ‘विद्यार्थी मार्गदर्शिका संच’ खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिका शाळांतील २०१९-२० या शैक्षणिक वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक भांडार व वितरण केंद्राकडून १५ टक्के सवलतीच्या दरात हे संच खरेदी करण्यात येणार आहे.

संच शाळांपर्यंत पोहोचविण्यासाठी ६० हजार रुपये वाहतूक खर्च आणि ५० हजार रुपये हमालीपोटी देण्यात येणार आहेत, तर संच खरेदीसाठी ६.९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेला एकूण ८.०४ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. २०१९-२० आणि २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये आवश्यकतेनुसार संच खरेदी करता यावे, यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल व्हावी असे पालिकेला वाटते. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मान्यतेकरिता शिक्षण समितीच्या गुरुवार, २६ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत पाठविला आहे. समितीच्या मंजुरीनंतर संचांची खरेदी प्रक्रिया सुरू होईल. मात्र प्रत्यक्ष संच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास जानेवारीची अखेर उजाडण्याची शक्यता आहे.

सध्या प्रत्येक शाळेत एक ‘विद्यार्थी मार्गदर्शिका संच’ देण्यात आला आहे. आता प्रति विद्यार्थी संच खरेदी करण्यात येत असून समितीची मंजुरी मिळाल्यानंतर १० ते १२ दिवसांमध्ये तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जाईल.

– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका