केवळ यशस्वी विद्यार्थ्यांची पळवापळवी करून क्लासचालक थांबलेले नाहीत, तर इतर क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे यश जाहिरातीतून आपल्या नावावर खपविण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘हेरण्याच्या’ कामात तरबेज असलेल्या कर्मचाऱ्यांचा ‘स्पेशल बिझनेस डेव्हलपमेंट सेल’च अनेक मोठमोठय़ा क्लासचालकांनी आपल्याकडे सुरू केला आहे.
जेईई-मेन्स, जेईई-अ‍ॅडव्हान्स, नीट आदी स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाले की, हा विभाग जोरदारपणे कार्यरत होतो. या परीक्षांच्या गुणवत्ता यादीत अव्वल असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे शोधून त्यांचा आपल्या क्लासशी येनकेनप्रकारेण संबंध आला होता का याचा धांडोळा या विभागातील कर्मचारी घेतात. हा संबंध फुकट टेस्ट सीरिज किंवा नोट्स अशा अनेक माध्यमांतून असू शकतो, किंबहुना या विद्यार्थ्यांवर दावा सांगता यावा यासाठी अनेक कोचिंग क्लासेस इतर क्लासेसच्या विद्यार्थ्यांना फुकट टेस्ट सीरिजचे गाजर दाखवीत असतात. त्यांना स्वस्तात आपल्या नोट्सही विकतात. या वर्षी जेईई-मेन्समध्ये अव्वल असलेल्या अनेक विद्यार्थ्यांशी स्वत:हून संपर्क साधून क्लासचालकांनी त्यांना टेस्ट सीरिज आणि नोट्स उपलब्ध करून दिल्या होत्या. हे करताना ते या विद्यार्थ्यांची छायाचित्रे आणि इतर माहिती संग्रहित करण्यास विसरत नाहीत.
निकाल जाहीर झाला की, असे विद्यार्थी धुंडाळून त्यांची माहिती व छायाचित्र आपल्या जाहिरातीत बिनदिक्कतपणे चिटकवायचे असा हा सारा फंडा असतो. ही सर्व कामे स्पेशल बिझनेस डेव्हलपमेंट सेलमार्फत केली जातात. मग ते विद्यार्थी भलेही दुसऱ्या क्लासचे असले तरी बेहत्तर. ज्यांच्या नावांच्या आधारे क्लासचालक ही जाहिरात करतात ते विद्यार्थी क्लासचालकांना जाब विचारत नाहीत, कारण प्रवेश प्रक्रियेत गुंतून गेल्याने तितका वेळ या विद्यार्थ्यांकडे नसतो. शिवाय ज्यांची छायाचित्रे वापरून हा खोटा दावा केला जातो ते विद्यार्थी जिथे राहतात त्याऐवजी वेगळ्या शहरांमध्ये वा राज्यांमध्ये क्लासची जाहिरात करून ही बनवेगिरी विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.
कित्येकदा तर ही बनवेगिरी इतक्या थराला जाते की, अनुसूचित जाती-जमातीतून किंवा इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीच्या अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय स्तरावरील गुणवत्ता क्रमांक खुल्या गटाचा म्हणून दावा केला जातो. या क्रमांकाच्या शेजारी कुठे तरी लहानसा ‘चांदणी’चा (स्टार) ठिपका असतो, पण या ठिपक्याचे स्पष्टीकरण जाहिरातीत कुठेच सापडत नाही. अशा या फसव्या जाहिरातींना आळा घालणारी कोणतीच यंत्रणा आताच्या घडीला कार्यरत नाही, त्यामुळे विद्यार्थी-पालकांनीच अशा खोटय़ा जाहिरात करणाऱ्या कोचिंगपासून सावध राहायला हवे.

क्लासचालकांच्या खोटय़ा जाहिरातींना आळा घालणारी यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनीच सावध राहून योग्य क्लासची निवड करावी.
जगदीश वालावलकर, आयडियल क्लासेस आणि अध्यक्ष,
महाराष्ट्र क्लासचालक संघटना

बाहेरच्या क्लासचालकांनी खोटय़ा जाहिरातींचे सत्र ज्या पद्धतीने चालविले आहे, त्यापासून सर्वसाधारण क्लासचालक दूर होते, पण आता ‘जेईई’, ‘नीट’चे क्लासचालक मोठय़ा प्रमाणावर जाहिराती करू लागले आहे. हा खर्च शेवटी ते विद्यार्थ्यांच्याच खिशातून वसूल करणार आहेत.  

नरेंद्र बांबवानी, रिलाएबल क्लासेस

शुद्ध फसवणूक :  ज्यांची छायाचित्रे वापरून हा खोटा दावा केला जातो ते विद्यार्थी जिथे राहतात त्या ऐवजी वेगळ्या शहरांमध्ये वा राज्यांमध्ये क्लासची जाहिरात करून ही बनवेगिरी विद्यार्थ्यांच्या लक्षात येणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. कित्येकदा तर ही बनवेगिरी इतक्या थराला जाते की अनुसूचित जाती-जमातीतून किंवा इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांमधून गुणवत्ता यादीच्या अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय स्तरावरील गुणवत्ता क्रमांक खुल्या गटाचा म्हणून दावा केला जातो. या क्रमांकाच्या शेजारी कुठेतरी लहानसा ‘चांदणी’चा (स्टार) ठिपका असतो. पण, या ठिपक्याचे स्पष्टीकरण जाहिरातीत कुठेच सापडत नाही.
समाप्त