नाटय़संगीत मराठी रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असून तरुण गायक-गायकांनी आपल्या सुरेल स्वरातून ‘शाकुंतल ते कटय़ार’ हा सांगीतिक प्रवास नुकताच उलगडला. ‘वसंतराव देशपांडे संगीत सभा’ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पं. चंद्रकांत लिमये यांचे होते. दिवंगत ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे यांच्या ९६व्या जयंतीच्या निमित्ताने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. निवेदन, गप्पा, किस्से, आठवणी आणि नाटय़पदातून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, सावनी रवींद्र यांच्याासह पं. लिमये यांच्या गुरुकुलातील केतकी तेंडोलकर, ओंकार मुळे, स्वानंद भुसारी, सीमा ताडे हे तरुण गायक-गायिका सहभागी झाले होते. ज्येष्ठ अभिनेत्री व अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या माजी अध्यक्षा फैय्याज, ज्येष्ठ सतारवादक व बंदिशकार पं. शंकर अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष पं. चंद्रकांत लिमये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील ‘पंचतुंड नररुंड मालधर’ या नांदीने मैफलीची सुरुवात झाली.त्यानंतर ‘नाथ हा माझा’, ‘मला मदन भासे हा’, ‘सत्यवदे वचनाला’ (मुग्धा), ‘प्रिये पाहा’, ‘जय गंगे भागीरथी’, ‘परवशता पाश दैवी’ (प्रथमेश), ‘संगीत शारदा’मधील काही नाटय़पदांची मेडली, ‘खरा तो प्रेमा’, तसेच ‘नाथ हा माझा’ या नाटय़पदाची मूळ बंदिश ‘हारवा मोरा’ (केतकी ), ‘विमल अधिर’ (ओंकार), ‘संगीत शाकुंतल’ नाटकातील साकी ‘दौडत हे मृग’ व दिंडी ‘अन्यधर्मी’, ‘सुकांता चंद्रानना’, ‘सुरत पिया की’ (स्वानंद), ‘जोहार मायबाप’ (सीमा ताडे) अशी एकाहून एक सरस नाटय़पदे सादर झाली. नाटय़पदांच्या मूळ बंदिशी, दादरे यांची ओळख पं. लिमये यांनी आपल्या स्वरातून करून दिली. निवेदन दीप्ती भागवत यांचे होते.
रंगलेल्या मैफलीची भैरवी ‘सुकतात जगी या’ नाटय़पदाच्या ध्वनिचित्रफितीने झाली.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..