चालत्या गाडय़ांमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार डबा स्वच्छ करण्याची सुविधा आता कोकण रेल्वेवरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन प्रमुख गाडय़ांमध्ये पुरवण्यात येणार आहे. ‘क्लीन माय कोच’ या सेवेचा वापर करण्यासाठी आता या गाडय़ांतील प्रवाशांना केवळ एक एसएमएस पाठवायचा आहे. या एसएमएसनंतर गाडीतील स्वच्छता कर्मचारी तातडीने प्रवाशांचा डबा साफ करतील. गुढीपाडव्यापासून या दोन गाडय़ांमध्ये ही सेवा पुरवण्यात येईल. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षी क्लीन माय कोच या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना इंग्रजीत ‘क्लीन’ असे लिहून मोकळी जागा सोडून आपला दहा आकडी पीएनआर क्रमांक ५८८८८ या नंबरवर एसएमएस पाठवायचा आहे. त्यानंतर गाडीतील स्वच्छता कर्मचारी तातडीने त्या डब्यात येऊन स्वच्छता करतील. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ही सेवा मांडवी एक्स्प्रेसमध्ये सुरू होईल. त्यानंतर त्याच दिवशी कोकणकन्या एक्स्प्रेसमध्येही ही सेवा पुरवली जाईल. प्रवाशांनी या सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलुगू यांनी केले आहे.