पालिकेच्या मदतीने सामाजिक संस्था, महाविद्यालयांकडून स्वच्छता
मुंबईत गौरी-गणपतीच्या विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावरच नातेवाईकांसह जेवण करून थर्माकॉलची ताटे किनाऱ्यावरच सोडून दिली. त्यामुळे नेहमीच्या कचऱ्यासह निर्माल्य व या थाळ्या हटवण्यात पालिका व पर्यावरणवादी सामाजिक संस्थांचा वेळ खर्ची पडला. वर्सोवा येथे हे दृश्य प्रकर्षांने दिसून आले असून येथे दहा हजारांच्या आसपास थर्माकॉलच्या खरकटय़ा थाळ्या काढल्याचे ‘वर्सोवा रेसिडंट व्हॉलेंटिअर्स’ संस्थेने स्पष्ट केले, तर जुहू चौपाटी येथेही रविवारी पालिकेला सहकार्य म्हणून सामाजिक संस्था व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही गणपती विसर्जनानंतर किनाऱ्यावर प्लास्टिक व निर्माल्य जमा केले.
मुंबईत गणपती विसर्जनाला आलेल्या भाविकांनी गौरी-गणपतीला शनिवारी भावपूर्ण निरोप दिल्यानंतर सागरकिनारीच नातेवाईक, मित्रपरिवारासह जेवणावळी उरकल्या. या ताटांचा खच वर्सोवा किनाऱ्यावर दिसून आला असून गेले ४८ आठवडे वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता ठेवणाऱ्या ‘वर्सोवा रेसिडंट वॉलेंटिअर्स’ या संस्थेने थर्माकॉलची ताटे जमा करून पालिकेच्या स्वाधीन केली. गेले काही शनिवार व रविवार आम्ही वर्सोवा किनारपट्टीवर साफसफाई करीत असून शनिवारी सकाळी १२ हजार किलो, तर रविवारी सकाळी ८ हजार किलोंच्या आसपास कचरा उचलण्यात आला, असे संस्थेचे प्रमुख आफ्रोज शहा यांनी सांगितले.रविवारी सकाळी महाराष्ट्र नेचर पार्क, रे स्पोर्ट्स, डब्ल्यूडब्ल्यूएफ संस्था, इको बडीज, मानव एकता मिशन, मुमो संस्था तसेच एम. डी. महाविद्यालय, के. सी. महाविद्यालय, बांदोडकर महाविद्यालय, विबग्योर हायस्कूल, डॉन बॉस्को केंद्र आदींनी चौपाटीवरील ओल्या व सुक्या कचऱ्याचे चार टप्प्यांत वर्गीकरण केले. किनारपट्टीवरील ४०० मीटर परिसरात साठलेला निर्माल्य या संस्थांच्या १८० कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह उचलला.
रेल्वे ब्लॉकमुळे हाल; १४ प्रवाशांचा बळी
मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेने मेगा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र विशेष ब्लॉकच्या निर्णयामुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी ब्लॉकसाठी अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी गणेश विसर्जनावेळीही भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे दादर, कुर्ला, ठाण्यासह विविध स्थानकांवर सायंकाळी गर्दी उसळली होती. त्यातच, शनिवारी दिवसभरात तिन्ही मार्गावर वेगवेगळ्या अपघातांत १४ प्रवासी मृत पावले, तर १४ प्रवासी जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या.
पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १२ ते शनिवारी मध्यरात्रीपर्यंत नोंद झालेल्या अपघातांत १४ जणांचा बळी गेला आहे. रेल्वे पोलिसांच्या नोंदीनुसार, सर्वाधिक मृत पावलेल्या प्रवाशांची संख्या ठाणे येथे आहे. दिवसभरात ठाणे येथे रेल्वे अपघातात तिघांचा बळी गेला, तर तीन जखमींची संख्या कुर्ला येथे नोंदवण्यात आली. तसेच गणेशोत्सवामुळे रेल्वेने मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर दर रविवारी नियमित चालणारे ब्लॉक रद्द केले. पण सायन आणि घाटकोपर येथे पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याच्या कामानिमित्त विशेष ब्लॉक घेण्यात आला. या ब्लॉकमुळे काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. नेमके शनिवारी गणपती-गौरी विसर्जन असल्याने मोठी गर्दी विविध चौपाटय़ांवर उसळली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:41 am