News Flash

सारासार : धुळीचे साम्राज्य

सर्वच दोष रस्त्यांवरील वाहतुकीला देता येणार नाही. उरलेल्या ६५ टक्क्यांमध्येही अनेक घटक येतात

दिवाळीसाठी घर झाडायला घेतले असेल तर धूळ ही काय चीज आहे, ते लक्षात आले असेलच. एखादी वस्तू अनेक थरातील वेष्टनात गुंडाळून कपाटात, पलंगाच्या कप्प्यात, कडेकोट बंदोबस्तात ठेवल्यावरही त्यावर धूळीची पुटे चढतात. हे झाले बंद कप्प्यामागचे, पलंगाखाली, कपाटामागे, वाऱ्याचा सहज संचार असलेल्या ठिकाणी धुळीचे साचलेले थर बघून अवाक व्हायला होते. धुळीचा तो गुणधर्मच आहे. हे धुळीचे कण इतके सूक्ष्म असतात की त्यांना जणू एखाद्या वस्तूच्या आरपार जाण्याची अगाध शक्तीच प्राप्त झालेली असते. सूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म तर एका केसाच्या अग्रभागावर धुळीचे शेकडो कण सहजी मावतात, आता बोला!

मुंबईकरांना धूळ तशी नवीन नाही, पाचवीलाच पुजलेली. घरातल्या बायकांचे तर अध्रे आयुष्य धूळ झाडण्यात, पुसण्यात, धुण्यात जाते. ही धूळ येते कुठून? अगदी बरोबर, ज्यांचे घर किंवा खिडक्या रस्त्याच्या बाजूने आहेत त्यांच्या घरात जास्त धूळ येते. म्हणजे शहरातील रस्ते हे धुळीचे प्रमुख स्रोत आहेत. २०१० मध्ये ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था’ (नीरी) यांनी केलेल्या अभ्यासात हेच दिसून आले. शहरातील धुळीत कच्च्या व पक्क्या रस्त्यांवरून उडणाऱ्या सूक्ष्म कणांचे प्रमाण २९ टक्के आढळले. खड्डेमय रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरही धुळीचे वादळ आल्यासारखी स्थिती निर्माण होते. त्यातच रस्ते बांधणे, रस्त्यांचा पृष्ठभाग सपाट करणे या कामांमुळे प्रदूषण होते. रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांच्या धुरांडय़ातून बाहेर पडणारा धूरही धुळीत भर घालतो. गाडय़ांमधून बाहेर पडणाऱ्या धुरात कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड हे घातक वायू असतात. हे प्रमाण एकूण धुळीच्या ६ टक्के असते. म्हणजे केवळ रस्ते व वाहनांचे प्रदूषण यामुळे तब्बल ३५ टक्के म्हणजे एक तृतीयांश धूळ घरात येते. रस्त्यांचे जाळे जेवढे जास्त व गुंतागुंतीचे तेवढेच धुळीचे प्रदूषण थेट नाकात शिरण्याची शक्यता अधिक.

सर्वच दोष रस्त्यांवरील वाहतुकीला देता येणार नाही. उरलेल्या ६५ टक्क्यांमध्येही अनेक घटक येतात. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती केंद्रामधूनही मोठय़ा प्रमाणात धूळ बाहेर फेकली जाते. पण ही धूळ हवेच्या वरच्या थरात जात असल्याने सामान्यांच्या थेट संपर्कात येत नाही. धुळीचा आणखी एक महत्त्वाचा निर्मितीस्रोत म्हणजे कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या घटना. या वर्षी देवनारमध्ये लागलेल्या प्रचंड आगीने या समस्येला वाचा फोडली. कचरा तसेच अनेक वस्त्यांमध्ये पेटवली जाणारी चूल यांचाही १४ टक्के वाटा आहे.

शहरात सतत चाललेल्या बांधकामांबाबत तर बोलण्याची सोय नाही. वर्षांच्या प्रत्येक महिन्यात अगदी  पावसाळ्यातही बांधकाम सुरूच राहते. या बांधकामात सिमेंट, काँक्रीट, रेती याचे हवेत उडणारे कण घातकच. महत्त्वाचे म्हणजे धूळ किती उडते यापेक्षा आपल्या शरीरापर्यंत ती कशी पोहोचते ते देखील महत्त्वाचे आहे. म्हणजे आपल्या घरात सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामामुळे कदाचित शहरातील प्रदूषणात ०.०००१ टक्क्यांनीही भर पडणार नाही. मात्र दिवसरात्र नाकातोंडातून शरीरात जात असलेल्या धुळीचा आपल्याला सर्वाधिक त्रास होऊ शकेल. हेच स्मशानातील जळणाबाबत बोलता येईल. यातून निघालेल्या धुरामुळे शहरातील धुळीत विशेष फरक पडत नसला तरी अग्नीच्या जवळपास उभे असणाऱ्यांना नक्कीच त्रास होईल. घर, हॉटेल, उपाहारगृह, जहाजे, विमाने आपापल्या परीने शहरातील धुळीत स्वतचा हिस्सा उचलत असतात.

दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करण्याची परंपरा कशी सुरू झाली, ते सांगता येणार नाही. मात्र थंडीत जमिनीलगतच्या धुळीचा आपल्याला सर्वाधिक त्रास होतो, एवढे नक्की. हिवाळ्यात आकाश निरभ्र असल्याने रात्री जमीन व जमिनीजवळ असलेली हवा लवकर थंड होते. हवा थंड झाली की तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता घटते आणि पाण्याचे कण तयार होतात. हिवाळ्यात पहाटे धुके दिसते, ते यामुळेच. मात्र धुक्याचे कवित्व किमान शहरवासीयांसाठी संपलेले आहे. कारण मुंबईत ते केवळ धुके राहत नाही तर त्यात धूळ मिसळल्याने जमिनीपासून अगदी ३० मीटर उंचीपर्यंत धुळीचा पडदा (हेज) तयार होतो. त्यामुळे मॉìनग वॉकला जाणाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता निर्माण होते.

अर्थात सर्व धुळीची निर्मिती एकटय़ा मुंबई, ठाणे, नवी मुंबईत होते असेही नाही. अरबी समुद्राचे हजारो किलोमीटरचे अंतर पार करून गल्फच्या आखातातूनही शहरात धुळीचे लोट येतात. या घटना साधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये घडतात. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या या धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या हवेचे दोन दिवस तीनतेरा वाजले होते. एका घनमीटर हवेत १०० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त धूलिकणांची नोंद होणे आरोग्यासाठी घातक मानले जाते. पावसाळा वगळता मुंबईतील धूलिकणांची संख्या यापेक्षा जास्तच होती. मात्र गल्फच्या आखातातून आलेल्या वादळामुळे चार वर्षांपूर्वी, म्हणजे २१ मार्च २०१२ रोजी दुपारी चार वाजता धूलिकणांची पातळी तब्बल ७९७ मायक्रोग्रॅमवर पोहोचली होती. या वादळाचा परिणाम दोन दिवसांनी कमी झाला. मात्र मुंबईत हिवाळ्यातील चार महिन्यात ८० टक्के म्हणजे १२० पकी ९५ दिवस वातावरणात धुळीचा जाड थर असतोच.

धुळीमुळे श्वसनाला त्रास, दम्याच्या विकारात वाढ वगरे प्रकार होतातच. पण सुरुवातीला सांगितले तसे धुळीचे काही कण इतके सूक्ष्म असतात की त्यांना अगदी आरपार भेदण्याची क्षमता असते. हीच क्षमता वापरून ते आपल्या शरीरातही अक्षरश कोणत्याही भागात पोहोचतात व जमा होऊ शकतात. हे धूलिकण नेमके काय आहेत व ते शरीराच्या कोणत्या भागात (मेंदू, यकृत, रक्त, मूत्रिपड इ. इ. ) आहेत त्यावरून त्यांच्या परिणामांचे गांभीर्य ठरते. दिवाळीच्या निमित्ताने घरातली धूळ साफ करताना तिचे ‘महात्म्य’ही कळावे, म्हणून हा प्रयत्न!

प्राजक्ता कासले prajakta.kasale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 2:22 am

Web Title: cleaning dust on the occasion of diwali
Next Stories
1 सेवाव्रत : वात्सल्याचा झरा
2  ‘विद्युत ऑडिट’ होत नसल्याने निवासी संकुलात आगीच्या घटना
3 स्थगिती आदेश, तरीही कारवाई
Just Now!
X