महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेरील मोकळ्या जागेत गुरुवारी रस्ते सफाई कामगारांनी गर्दी केली होती. पालिकेने कंत्राटदाराला पैसे न दिल्याने गेले दोन महिने पगार मिळाला नाही़  त्यामुळे आता इथेच जेवायला आलो आहोत, असे सांगत पाचपन्नास बाया-पुरुष शांतपणे दालनाबाहेर बसून होते. कंत्राटदारांच्या या कामगारांचा आमच्याशी संबंध नाही, अशी भूमिका पालिका अधिकाऱ्यांनी सुरुवातीला घेतली. मात्र कामगारांनी काही तास ठिय्या मांडल्यानंतर दोन दिवसांत पगार मिळेल, असे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी त्यांना वाटेला लावले.
वांद्रे ते सांताक्रूझ दरम्यान लिंक रोड, कार्टर रोड, एस. व्ही. रोड, तसेच भाभा रुग्णालय, लिलावती रुग्णालय परिसरातील रस्ते सफाईचे कंत्राट पालिकेने कंत्राटदारांना दिले आहे. संबंधित कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या सुमारे १०० कामगारांना एप्रिल महिन्यापासूनचा पगार मिळालेला नाही. दोन महिने उलटूनही पगार मिळत नसल्याने अखेर कामगारांनी पालिका मुख्यालयात धाव घेतली. पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना मुख्यालयातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. मात्र ते ठिय्या देऊन बसले. ‘आज आम्ही अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्याकडे जेवायला आलो आहोत. दोन महिने पगार नाही. त्यामुळे घरात धान्याचा एक कणही नाही. आज आम्ही इथून जेवूनच जाणार. पोलिसांनी उचलून नेले तर पोलिस ठाण्यात जेवणार. पण घरी जाणार नाही. घरात जेवण नाही’, असे या कामगारांना मुख्यालयात घेऊन येणारे कचरा वाहतूक श्रमिक संघाचे मिलिंद रानडे यांनी सांगितले.
अखेर अतिरिक्त आयुक्त अडताणी यांनी कामगारांशी चर्चा करून त्यांना आश्वासन दिले आणि वाद मिटविला़.