ताडदेवच्या तुळशीवाडीत पुनर्विकासाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या सेवा निवासस्थानातील घराचा मालकी हक्क मंगळवारी तब्बल ५०३ सफाई कामगारांना देण्यात आला. मुंबईत हक्काचे घर मिळाल्याने सफाई कामगारांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. या आनंदाच्या भरात सफई कामगारांनी मंगळवारी एकच जल्लोष केला.
ताडदेवमधील तुळशीवाडीतील पालिकेच्या वसाहतीमधील इमारती मोडकळीस आल्या होत्या. मोडकळीस आलेल्या या इमारतींमधील १८० चौरस फुटाच्या घरात अनेक समस्यांचा सामना करीत ७२४ सफाई कामगार दिवस कंठत होते. गेल्या दीड वर्षांपूर्वी श्रमसाफल्य योजनेअंतर्गत या वसाहतीचा पुनर्विकास करण्यात आला. त्यानंतर ५०३ सफाई कामगार नव्या इमारतीमधील ३०० चौरस फुटाच्या घरात राहावयास गेले. सफाई कामगारांना या घराचा हक्क मिळावा यासाठी खासदार मिलिंद देवरा राज्य सरकारकडे, तर विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम पालिकेत पाठपुरावा करीत होते. अखेर राज्य सरकारने सफाई कामगारांना या घरांचा मालकी हक्क देण्याचा आदेश पालिकेला दिला. पालिकेलाही तुळशीवाडीत १०८६ अतिरिक्त सेवा निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत.
श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पालिकेच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्यात आला.
 या योजनेच्या माध्यमातून ताडदेव येथे सफाई कामगारांना प्रथमच हक्काचे घर मिळाले असून मुंबईतील ही पहिलीवहिली योजना ठरली आहे. आता पालिकाही आपल्या वसाहतींमधील सफाई कामगारांसाठी श्रमसाफल्य गृहनिर्माण योजना राबवित आहे.