स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धा; विजेत्यांसाठी १३ पारितोषिके

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई :  निवासी संकुल, मोहल्ला, रुग्णालये, हॉटेल, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये आदींची स्वच्छता ठेवणाऱ्या मुबईकरांसाठी पालिकेने स्वच्छता स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये विविध प्रवर्गात मिळून एकूण ४ लाख ५० हजार रुपयांची १३ पारितोषिके दिली जाणार आहेत.

केंद्र शासनाच्या गृह व नागरी मंत्रालयाने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ अंतर्गत निकष आखून दिले आहेत. यात बृहन्मुंबई महानगरपालिका सहभागी आहे. त्याचा एक भाग म्हणून मुंबईतील निवासी संकुल, मोहल्ला, महानगरपालिका तसेच शासकीय कर्मचारी निवासस्थाने, रुग्णालये, बाजारपेठा , हॉटेल, शाळा आदींची स्वच्छतेच्या दृष्टीने  स्पर्धा घेतली जाणार आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. निवासी संकुल, मोहल्ला, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा, बाजार संघटना, शासकीय कार्यालये आदींची स्वच्छता तपासणी करून विजेत्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाणार आहे.

विविध स्पर्धा

कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग ३ आर तत्त्व आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयावरील जिंगल, रेखांकने, भित्तीपत्रिका, चित्रफिती,? भित्तीचित्रे व पथनाटय़े यांचीदेखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केली जातील.

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..

या स्पर्धेमध्ये सहभागी होता  यावे, यासाठी इच्छुकांचे https://www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan या संकेतस्थळावर २७ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत तपशीलवार माहितीसह भरणे आवश्यक आहे.  या स्पर्धेमध्ये हॉटेल (बसण्याची क्षमता ५० पेक्षा अधिक), शाळा(महानगरपालिका व खासगी), रुग्णालये (खासगी व महापालिका), अशा  प्रवर्गात ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक एका विजेत्यास देण्यात येईल. या स्पर्धेची अधिक माहिती हवी असल्यास, सहाय्यक आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या अखत्यारितील कार्यकारी अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) स्वच्छ भारत अभियान यांचे कार्यालय, ५ वा मजला, खटाव मार्केट इमारत, ग्रँट रोड (पश्चिम), दूरध्वनी क्रमांक ०२२—२३८५०५७२ येथे संपर्क साधावा.