लोकल गाडीवर स्वच्छतेबाबत जनजागृतीचे संदेश

रेल्वे स्थानके, लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या स्वच्छतेसाठी रेल्वेकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वे २ ऑक्टोबर गांधी जयंत्तीनिमित्त स्वच्छता लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल गाडीवर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारे संदेश असतील. महत्त्वाची बाब म्हणजे महात्मा गांधी यांचे चित्रही या गाडीवर रेखाटलेले असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

स्थानकात प्रवेश करताच फलाटांवर असणारा कचरा, ठिकठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या, अस्वच्छ प्रसाधनगृहे असेच चित्र दिसून येते. स्थानके स्वच्छ केली जात असल्याचा दावा जरी रेल्वे प्रशासनाकडून केला जात असला तरी बहुतांश स्थानके ही अस्वच्छच दिसतात. त्यात लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या सफाईकडेही काही वेळा दुर्लक्ष झालेले असते. नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छ स्थानकांमध्ये पश्चिम व मध्य रेल्वेवरील एकाही स्थानकाने आघाडी घेतलेली नाही.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीतही स्थानके स्वच्छ करण्यावर भर देतानाच २ ऑक्टोबपर्यंत पंधरा दिवसांची स्वच्छता मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली आहे.

ही मोहीम घेतानाच २ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेबाबत संदेश देणारी लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या कळवा कारशेडमध्ये लोकल गाडीवर भारतीय ध्वजाचे रंग रेखाटण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे संदेशही नमूद केले असून यामध्ये स्वच्छ भारत, एक कदम स्वच्छता की ओर यासह अन्य काही संदेश आहेत. कळवा कारशेडमधील कर्मचाऱ्यांबरोबरच कल्याण रेल्वे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या कामात हातभार लावला आहे.

या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी २ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेबाबत संदेश देणारी एक लोकल गाडी चालविण्यात येणार असल्याचे सांगितले. ही गाडी हार्बर किंवा ठाणे-वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येणार आहे. रेल्वे स्थानके, लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ांच्या स्वच्छतेसाठी हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत स्वच्छता लोकल चालविण्यात येणार आहे.