जंतुनाशकाच्या उधळणीमुळे रस्ते लालभडक; पालिकेच्या विभाग कार्यालयाचा अतिउत्साह

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये आपला क्रमांक वर यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून नाना क्लृप्त्या लढवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अतिउत्साह नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू लागला आहे. पालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील परिसरात आयझॉल या जंतुनाशकाची अक्षरश: उधळण सुरू केली असून त्यामुळे येथील रस्ते लालभडक दिसू लागले आहेत. रस्त्यावरील वाहनांच्या रहदारीमुळे ही धूळ उडून दुकाने व घरांत जाऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रातील अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे पालिकेने संपूर्ण मुंबईत जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’त मुंबईचा क्रमांक घसरू नये म्हणून पालिका अधिकारी कामाला लागले आहेत. मात्र, काही ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांकडून अतिरेक होऊ लागला आहे.

‘सी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत ठाकूरद्वार, मरिन ड्राइव्ह, चिराबाजार, भुलेश्वर, सी. पी. टँक, नळबाजार, अब्दुर रहमान स्ट्रीट आणि आसपासचा परिसर येतो. या परिसरात तब्बल एक लाख ६७ हजार ५९८ लोकसंख्या असून दर दिवशी या परिसरात २६५ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. अस्वच्छतेमुळे ‘स्वच्छ भारत अभियाना’त फटका बसू नये म्हणून ‘सी’ विभाग कार्यालयाने युद्धपातळीवर सफाई मोहीम हाती घेतली आहे. मात्र या सफाई मोहिमेत ‘सी’ विभाग कार्यालयाने तर ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी अतिरेकच सुरू केला आहे. आपला विभाग काही तरी वेगळे करीत असल्याचे दाखविण्यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सकाळी आयझॉल पावडरची उधळणच करण्यात येत आहे. या उधळणीतून छोटय़ा गल्ल्याही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पदपथ आणि रस्ते लालेलाल होऊन गेले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरही पावडरचे थर चढू लागले आहेत. वाहतुकीमुळे रस्त्यावरील आयझॉल पावडर उडू लागली असून रस्त्यावर विकला जाणारा भाजीपाला, फळ, खाद्यपदार्थावर ती बसू लागली आहे. या परिसरातील रहिवाशी आणि दुकानदारांना या कीटकनाशकाचा त्रास होऊ लागला आहे. या परिसरात आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

आयझॉल पावडर..

  • मुंबईमध्ये साफसफाई केल्यानंतर सफाई कामगार नियोजित ठिकाणी कचरा साचवून ठेवतात. हा कचरा कचरावाहू वाहनांमधून कचराभूमीमध्ये पोहोचता केला जातो. कचरा उचलून नेल्यानंतर कचऱ्यातील घाणेरडय़ा पाण्यामुळे चिखल होतो. या पाण्यात जंतू निर्माण होऊ नयेत, यासाठी कचरा उचलून वाहनात भरल्यानंतर त्या ठिकाणी लाल रंगाची आयझॉल आणि पांढऱ्या रंगाची ब्लीचिंग पावडर टाकण्यात येते. रस्त्यालगत साचणाऱ्या पाण्यावरही आयझॉल टाकण्यात येते.
  • आयझॉल पावडरमध्ये रसायनांचा समावेश असतो. या पावडरची अनावश्यक फवारणी केल्यास ती हवेमधून इतरत्र उडत राहते. श्वसनातून शरीरात गेल्यास तिचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

स्वच्छतेसाठी परिसरात आयझॉल पावडर टाकण्यात आली होती; पण आता ही पावडर टाकण्याचे थांबविण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणावर लाल रंग असलेली ही पावडर घेण्याचे पालिकेने बंद केले आहे.

जीवक संतोष घेगडमल, साहाय्यक आयुक्त, ‘सीविभाग