15 October 2019

News Flash

‘वर्ल्ड वन टॉवर’च्या उंचीबाबत उल्लंघन न झाल्याचे स्पष्ट

लोअर परळ येथील पूर्वीच्या श्रीनिवास कॉटन मिलच्या जागेवर मुंबईतील हा उत्तुंग टॉवर उभा राहात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ग्राहकांना व्याज देण्याचे ‘महारेरा’चे आदेश  

मुंबईतील सर्वात उंच ‘वर्ल्ड वन’ टॉवरला संपूर्ण ११७ मजले बांधण्यासाठी आवश्यक असलेले भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अद्याप मिळाले नसल्याची बाब पुढे आली आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या प्रकल्पाच्या उंचीबाबत कुठल्याही प्रकारचे उल्लंघन नसल्याचे ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणा’पुढे (महारेरा) सुरू असलेल्या सुनावणीमुळे स्पष्ट झाले आहे. या टॉवरसाठी आवश्यक असलेल्या ५०१.३३ मीटरऐवजी २८४.२९ मीटर इतक्याच उंचीसाठी हे प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याची बाबही यामुळे उघड झाली आहे.

लोअर परळ येथील पूर्वीच्या श्रीनिवास कॉटन मिलच्या जागेवर मुंबईतील हा उत्तुंग टॉवर उभा राहात आहे. लोढा डेव्हलपर्समार्फत या टॉवरचे काम २०१० मध्ये सुरू करण्यात आले. हा प्रकल्प तीन टप्प्यांत विकसित करण्याचे ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील ४३ मजल्यापर्यंतच्या बांधकामाला २९ जुलै २०१७ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याची महारेराकडे नोंद करण्यात आलेली नाही. मात्र दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाची (४४ ते ८० मजले) नोंद महारेराकडे करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख ३० सप्टेंबर २०१८ होती. परंतु महारेराने वर्षभराची मुदत दिल्याने आता घराचा ताबा देण्याची नवी तारिख ३० सप्टेंबर २०१९ अशी आहे. या दुसऱ्या टप्प्यात प्रशस्त निवासी सदनिका आरक्षित केलेल्या मन्वी कॉम्प्युटेक प्रा. लि., सॅमसंग ओव्हरसीज लि. आणि अशोक मिंडा यांनी या प्रकल्पात उंचीबाबत उल्लंघन केल्याचे तसेच सदनिकेचा ताबा देण्यासाठी वेळ लावल्याने व्याज देण्याची मागणी करणारी तक्रार केली. या तक्रारीबाबत महारेराकडे सुनावणी सुरू होती. याप्रकरणी गेल्या वेळी इमारतीच्या उंचीचे मोजमाप करण्याचे आदेश महारेराने मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिले होते आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हा अहवाल सादर झाला असून त्यानुसार या प्रकल्पाच्या उभारणीत उंचीबाबत उल्लंघन झाल्याचा तक्रारदारांचा दावा महारेराने फेटाळला आहे. मात्र झालेल्या विलंबाबाबत या ग्राहकांना नियमानुसार व्याज देण्याचे आदेश दिले आहे. या सुनावणीमुळेच या टॉवरसाठी आवश्यक असलेले विमानतळ प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र २८४ मीटपर्यंतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

First Published on May 23, 2019 12:55 am

Web Title: clearly there is no violation of the height of the world one tower