राज्यातील हवामानात सध्या झपाटय़ाने बदल होत आहेत. अंशत: ढगाळ स्थितीनंतर आठवडाभर राज्यात सर्वदूर कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परिणामी आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात थंडी कायम राहणार असून, त्यानंतर तापमानात वाढ होत जाण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील किमान तापमान सरासरीखाली असल्याने तेथे गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार नोंदविले जात आहेत.

राज्यात गेल्या आठवडय़ापासून हवामानात झपाटय़ाने बदल झाले. थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे दोन ते तीन दिवस बहुतांश भागातील किमान तापमान सरासरीखाली गेले होते. राज्यात अनेक ठिकाणी तापमान १० अंशांपर्यंत घसरले होते. मुंबईतदेखील पारा सरासरीखाली येत १३ अंशांपर्यंत नोंदविला गेला होता. पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या संगमामुळे विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली होती. विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सध्या या भागातील किमान तापमानात पुन्हा घट होऊन गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या रात्रीच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी दिवसाचे कमाल तापमान सरासरीखाली आले आहे.

हवामान विभागाचा अंदाज : हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ फेब्रुवारीपर्यंत राज्यात सर्वत्र कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. सध्या मध्य प्रदेशात काही ठिकाणी थंडीच्या लाटेची स्थिती आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडील काही राज्यांत कडाक्याची थंडी कायम आहे. परिणामी आठवडाभर राज्यात कमी-अधिक प्रमाणात गारठा राहू शकेल. मात्र, वाऱ्यांच्या दिशेत बदल होत असल्याने आठवडय़ानंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल. परिणामी दिवसा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील भागात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, तर राज्याच्या अंतर्गत भागात २८ ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान असेल.

आठवडाभरात वाऱ्याची दिशा उत्तर-पूर्व होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होत जाण्याची शक्यता आहे.

– कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, हवामान विभाग, पश्चिम विभागीय केंद्र