वाढत्या व्यापारीकरणाचा फटका; ज्येष्ठ गिर्यारोहक जॉन पोर्टर यांची टीका

मुंबई : ‘आजवर आरोहण न झालेल्या किंवा इतर कठीण शिखरांपेक्षा हमखास यश मिळवून देणाऱ्या किंवा वलय मिळवून देणाऱ्या शिखरांवर आरोहणाकडे सध्या गिर्यारोहणाचा कल झुकलेला आहे. वाढत्या व्यापारीकरणामुळे एव्हरेस्टचे आरोहण म्हणजे साहसी पर्यटनच झाले आहे,’ अशी खरमरीत टीका ज्येष्ठ गिर्यारोहक आणि इंग्लडच्या अल्पाइन क्लबचे अध्यक्ष जॉन पोर्टर यांनी केली. जॉन पोर्टर गिरिमित्र संमेलनासाठी भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी ‘लोकसत्ता’ला विशेष मुलाखत दिली.

जॉन पोर्टर यांनी ७० आणि ८०च्या दशकात आल्प्स पर्वतराजीमध्ये अनेक खडतर मोहिमा केल्या आहेत. मोठय़ा लवाजम्यासह आखल्या जाणाऱ्या मोहिमांच्या वाटेला न जाता अल्पाइन शैलीच्या आरोहणाला त्यांनी जवळ केले. गिर्यारोहणाची सर्व साधनसामग्री स्वत:च सोबत नेणे, शेर्पा आणि भारवाहकांचा आधार न घेता छोटय़ा चमूने आरोहण करण्याला प्राधान्य देणारी अल्पाइन शैली त्यांनी आत्मसात केली. आज मात्र सर्वत्र केवळ हमखास यशाची खात्री देणाऱ्या व्यापारी गिर्यारोहण मोहिमांची सर्वत्र चलती असल्याचे ते विशादाने नमूद करतात. सध्याच्या काळातील गिर्यारोहणाच्या लोकप्रियतेची मीमांसा करताना ते सांगतात, ‘सात खंडातील सात शिखरे, एव्हरेस्ट, सात खंडातील द्वितीय क्रमांकाची सात शिखरे अशा मोहिमांसाठी सर्व व्यापारी सेवा उपलब्ध असतात. त्या ठिकाणी यश मिळवून देण्याची खात्री आयोजकांकडून दिली जाते. किंबहुना या लोकप्रिय प्रकारांमुळे व्यापारीकरणाची वाढ होत असून आणि गिर्यारोहण खालावत चालले आहे.’

जगात अनेक शिखरांवर आजही आरोहण झालेले नाही, त्यासाठी वेगळी मेहनत करावी लागते. अशा शिखरांवर अनेकदा आरोहण यशस्वीदेखील होत नाही. मात्र त्यातून गिर्यारोहणाचा कस लागतो. खात्रीशीर यशापेक्षा, अज्ञानातील आनंद शोधणे महत्त्वाचे असल्याचे जॉन यांनी सांगितले.

सध्या सह्य़ाद्रीतील लोकप्रिय किल्ल्यांवर होत असलेल्या वाढत्या गर्दीची छायाचित्रे पाहिल्यावर, युरोपातील लोकप्रिय शिखरांवर कधी काळी अशीच गर्दी वाढल्याचे ते नमूद करतात. फ्रान्समधील माँट ब्लांकच्या पायथ्याच्या चामोनिक्समध्ये होणारी गर्दी केवळ पूर्वनोंदणी केलेल्यांनाच डोंगरावर प्रवेश देण्याची पद्धत सुरू झाल्यापासून नियंत्रणात आली. अर्थात याचवेळी अल्पाइन पद्धतीने आरोहण करणाऱ्यांसाठी हिमशिखर कायमच खुले असते, असे जॉन पोर्टर आवर्जून सांगतात.