|| प्रसाद रावकर

महालक्ष्मीच्या धोबी घाटात  हिवतापाच्या साथीचा प्रादुर्भाव

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे गावी निघून गेलेल्या ठिकठिकाणच्या वस्त्यांमधील रहिवाशांची अनेक घरे बंद असल्याने तेथून डासांची उत्पत्ती होत आहे. परिणामी डासांचा आणि हिवतापाचा प्रादुर्भाव होत असल्याचे मुंबई महापालिके चे म्हणणे आहे.

टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्यात झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची संख्या मोठी होती. परराज्यातील अनेकांनी गावची वाट धरली. यातील कित्येक जण अजूनही परतले नसल्याने त्यांची घरे बंदच आहेत. अनेकांच्या घरात ड्रम, बादली आदींमध्ये पाणी साठवून ठेवले असावे. तर काहींच्या घरामध्ये पाण्याच्या टाक्याही आहेत. तेथून डासांचा फै लाव होत असल्याचे पालिके चे म्हणणे आहे. झोपडपट्ट्या, वस्त्या, चाळींमधील डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासाठी पालिके च्या कीटक नियंत्रण विभागाची पथके कार्यरत आहेत. मात्र बहुसंख्य झोपडपट्ट्या, वस्त्यांमधील घरे बंदच असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घरे बंद असल्यामुळे तेथील डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेता आलेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

धोबीघाटात १६२ घरे बंद

महालक्ष्मीच्या धोबीघाटामध्ये हिवतापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याचे जुलै, ऑगस्टमध्ये आढळून आले होते. त्यामुळे कीटक नियंत्रण विभागाने धोबी घाटात विशेष मोहीम राबवली. धोबी घाटातील १६२ घरे बंद असल्याचे निदर्शनास आले. या घरांमधील रहिवासी  गावी निघून गेल्याचे आढळून आले. या बंद घरांमधील डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करता आली नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून धोबी घाटात काही जणांना हिवताप झाल्याचे निदर्शनास आले होते.

गेल्या दोन, तीन महिन्यांहून अधिक काळ झोपडपट्ट्या, वस्त्यांमधील अनेक घरे बंद आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्याच्या कामात अडथळा येत आहे. अशाच बंद घरांमध्ये प्रचंड प्रमाणात डास झाल्यामुळे हिवतापाची साथ वाढल्याचे महालक्ष्मीच्या धोबीघाटात आढळून आले आहे.

– राजन नारिंग्रेकर, प्रमुख कीटक नियंत्रण अधिकारी