करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकता वाटल्यास शाळा बंद ठेवण्यात याव्यात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिल्या आहेत.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे जेमतेम दोन-तीन महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या शाळा पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ अनेक भागांमध्ये आली आहे. काही दिवसांपासून सातारा, लातूर, वाशिम या जिल्ह्य़ांमध्ये विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर ‘आवश्यकता वाटल्यास शाळा बंद ठेवण्यात याव्यात,’ अशा सूचना गायकवाड यांनी दिल्या आहेत.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये करोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता आणि र्निजतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, असे गायकवाड यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे. राज्यात काही जिल्ह्य़ांतील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे लक्षात घेऊन समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग यांसह विविध विभागांशी चर्चा करण्यात येत असून सर्व जिल्ह्य़ांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

काही जिल्ह्य़ांत यापूर्वीच शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

वसतिगृहातील २२९ विद्यार्थ्यांना करोना

अकोला : वाशीम जिल्हय़ाच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहातील २२९ विद्यार्थी बुधवारी करोनाबाधित आढळले. यामुळे शाळेच्या वसतिगृहाची इमारत प्रतिबंधित करण्यात आली. सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना गंभीर लक्षणे नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.