शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देण्यावरून राजकीय नेत्यांपासून बुद्धिवंतांच्या मांदियाळीतून हल्ले-प्रतिहल्ले मंगळवारी तीव्र झाले असतानाच, ‘या वादावर पडदा टाकावा,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतल्याने राजकीय-सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. पुरस्कार वितरण समारंभाची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी संध्याकाळी राजभवनच्या सभागारात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार पुरंदरे यांना देऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेच आक्रमक पवित्रा घेतला होता. पुरंदरे यांच्या इतिहास संशोधन कार्याबद्दल शंका असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केल्याने या विरोधास बळ मिळाले होते. त्याच पाश्र्वभूमीवर, पुरंदरे यांना पुरस्कार देऊ नये या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काही नेत्यांनी मंगळवारी राज्यपालांची भेटही घेतली, मात्र, त्याच वेळी एका चित्रवाणी वाहिनीशी बोलताना वादावर पडदा टाकण्याची भूमिका पवार यांनी घेतल्याने आता विरोधाची धार मवाळ झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, आज दिवसभरात पुरंदरे यांच्या समर्थनासाठी राजकीय व साहित्यिक क्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुरंदरे यांच्या पुरस्काराचे जोरदार समर्थन केले.  राज्यात काही ठिकाणी या वादाच्या किरकोळ ठिणग्याही उडाल्या. अहमदनगरमध्ये गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, तर पंढरपूर, नांदेडमध्ये विरोधाची प्रतिक्रिया उमटली. या पुरस्कारासाठी पुरंदरे यांची निवड करताना सर्व निकष पूर्णपणे पडताळण्यात आले असून ही निवड अचूक व योग्यच असल्याचा निर्वाळा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिला. पुरस्कार सोहळ्यास गालबोट लागू नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते काळजी घेतील, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले.