भारत सध्या मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असून मागणी मंदावल्याने अर्थव्यवस्थेसाठी ती मोठी समस्या बनली आहे, असे सुतोवाच नोबेल विजते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी केले आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

बॅनर्जी म्हणाले, आपला देश सध्या मोठ्या आर्थिक मंदीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. १९९१च्या आर्थिक संकटापेक्षा सध्याचा विकास दर कमी असल्याने मागणीच्या वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. अर्थव्यवस्थेतील खरी अडचण ही मागणीशीच जोडलेली आहे. ते म्हणाले, आपल्याला बजेटसंबंधीची तूट आणि लक्ष्य पूर्ण करण्याच्या गोष्टी विसराव्या लागतील. इतकेच नव्हे आपल्याला महागाईशी संबंधीत जुने टार्गेट्सही सोडून द्यायला हवेत. उलट आपण अर्थव्यस्थेला थोडं वेगाने पुढे जाण्यास वाव दिला पाहिजे.

कॉर्पोरेट टॅक्सच्या कपातीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टिप्पणी करताना बॅनर्जी म्हणाले, मला वाटत नाही की सरकारचे हे पाऊल अर्थव्यवस्थेला वाचवू शकेल. कारण, कॉर्पोरेट क्षेत्राकडे रोकडीची कमी नाही. मात्र, ते ही रोकड योग्य कारणांसाठी वापरत नाहीत.