News Flash

बंद करोना केंद्रे पुन्हा सुरू करणार

करोना संशयितांमधील अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटांतील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करून संसर्ग रोखण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले होते.

|| प्रसाद रावकर

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर विचारप्रक्रिया सुरू

मुंबई : भविष्यात संशयित रुग्णांची वाढती संख्या आणि सध्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात उपलब्ध खाटा यांचे प्रमाण तुलनेत व्यस्त होण्याची दाट शक्यता लक्षात घेत यापूर्वी बंद केलेली करोना काळजी केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

करोना संशयितांमधील अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या गटांतील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात रवानगी करून संसर्ग रोखण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले होते. त्यासाठी पालिकेने मुंबईत ठिकठिकाणी ५० हजार ७७ खाटांची क्षमता असलेली ३२८ ‘करोना काळजी केंद्र-१’ सुरू केली. त्याचबरोबर २४ हजार १२५ खाटांची क्षमता असलेली १७४ ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी आवश्यक असलेली पाच हजार ४० खाटा क्षमता असलेली केवळ ६० ‘करोना काळजी केंद्र-२’ कार्यान्वित करण्यात आली.

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या जुलैमध्ये हळूहळू कमी होऊ लागली. परिणामी, त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांची संख्याही घसरू लागली.  संशयित रुग्णांना काही अटीसापेक्ष घरातच विलगीकरणातची परवानगी देण्यात आली. यामुळे करोना काळजी केंद्रांमधील बहुसंख्य खाटा रिक्तच होत्या. केंद्रावरील खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण हलका करण्यासाठी टप्प्याटप्प्याने गरज नसलेली केंद्रे बंद करून विभाग कार्यालयाच्या हद्दीत केवळ दोन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचाऱ्यांचे नियोजनही करता आले.

आजघडीला १७,६९८ खाटांची क्षमता असलेली ४३ ‘करोना काळजी केंद्र-१’ सुरू असून तेथे २,४२२ करोनाबाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्ण दाखल आहेत. संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीने २,१५८ खाटा असलेली १५ ‘करोना काळजी केंद्र-१’ सुरू करण्यात येणार आहेत. तर उर्वरित २६,७३३ खाटांची क्षमता असलेली २७६ ‘करोना काळजी केंद्र’ आरक्षित आहेत. तसेच आजघडीला २,९४१ खाटांची क्षमता असलेली २४ ‘करोना काळजी केंद्र-२’ कार्यान्वित असून गरजेनुसार २,३३० खाटा असलेली १३ ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्यात येणार आहेत. तर तब्बल १८,४२२ खाटांची क्षमता असलेली १४४ ‘करोना काळजी केंद्र’ सज्ज आहेत. मात्र संशयित रुग्णांची संख्या वाढली तरच ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णांची संख्या वाढत असली तरी तूर्तास करोना काळजी केंद्रांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. मात्र भविष्यात गरज भासल्यास बंद केलेली संस्थात्मक विलगीकरण केंद्रे कार्यान्वित करता येतील.

-सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:31 am

Web Title: closed corona centers will reopen akp 94
Next Stories
1 शिवसेनेला धूळ चारण्यासाठी भाजपची व्यूहरचना
2 महाराष्ट्रात ३६ डॉक्टरांचा करोनाने मृत्यू
3 व्यवसाय सुलभतेच्या ४२ टक्के सुधारणा कागदावरच
Just Now!
X