नगराध्यक्षांची यापुढे थेट निवडणूक नाही; प्रत्येक प्रभागातून एकच नगरसेवक

महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी प्रभागातून एकच नगरसेवक निवडण्याची किंवा नगराध्यक्षांची थेट निवडणूक रद्द करून नगरसेवकांमधूनच निवड करण्याची जुनीच पद्धत पुन्हा सुरू करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. या बदलास भाजपने कडाडून विरोध केला आणि राजकीय हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला.

राज्यात सत्ताबदल किंवा मुख्यमंत्री बदलल्यावर महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील निवडणूक पद्धतीत बदल करण्याची पडलेली परंपरा नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुढे सुरू ठेवली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. यानुसार प्रत्येक प्रभागामधून चार नगरसेवक निवडून देण्याची कायद्यात तरतूद करण्यात आली होती.

याशिवाय नगराध्यक्षांची थेट मतदारांमधून निवड करण्यात येत होती. महाविकास आघाडी सरकारने कायद्यात बदल करून जुनीच पद्धत पुन्हा लागू केली. या संदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार आदी सदस्यांनी या विधेयकाला विरोध केला. हा बदल राजकीय हेतूने केला जात आहे.

लोकशाहीत लोकांचे मत महत्त्वाचे असते. लोकांच्या फायद्याकरिताच हा बदल करण्यात आला होता याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. तर महापालिकांचे नगरसेवक किंवा नगराध्यक्षांशी कोणतीही चर्चा न करता हा बदल करण्यात आल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गेल्या वेळी भाजपला या सूत्राचा फायदा झाला होता. भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले होते. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भाजपचे नगरसेवकही जास्त निवडून आले होते. भाजपला राजकीयदृष्टय़ा शह देण्याकरिताच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने हा बदल केला आहे.

समर्थन..

महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मागणीनुसारच हा बदल करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले

. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रभागांमधील मतदारांचा गोंधळ उडतो. प्रभागातील कामे कोणी करायची याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच हा बदल करण्यात येत असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

नवे बदल असे..

*  महानगरपालिकांमध्ये एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येईल. सध्या मुंबई वगळता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या प्रभागांमध्ये चार नगरसेवक निवडून दिले जातात.

*  नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवडणूक होणार नाही. याऐवजी नगरपालिकांमधील निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्षांची निवड करतील.

*  आगामी फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर-कुळगावसह अन्य नगरपालिकांमध्ये हे बदल लागू होतील.