गेल्या तीन-चार वर्षांपासून निर्माण झालेले पाणी संकट संपताच राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा हमखास पैसे मिळवून देणाऱ्या उसाकडे वळला आहे. त्यामुळे पुढील गळित हंगामासाठी राज्यात विक्रमी ऊस उपलब्ध होणार असल्याने बंद साखर कारखान्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. आजवर उसाअभावी बंद असलेले कारखाने दीर्घ मुदतीसाठी चालविण्याचे प्रस्ताव काही कारखानदारांनी राज्य सहकारी बँकेला दिले आहेत. त्यामुळे डबघाईला व बंद पडलेले साखर कारखाने दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

सततच्या दुष्काळामुळे ऊस लागवडीवर र्निबध आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. उसाला अधिक पाणी लागत असल्याने उसाखालील क्षेत्रापैकी किमान ५० टक्के क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान दोन हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणून शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना राबवावी असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कृषी विभागास दिले आहेत. त्यानुसार पुढील पाच वर्षांत किमान ११.२५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले असले तरी मुबलक पाणी उपलब्ध होताच शेतकऱ्यांनी मात्र आपला मोर्चा पुन्हा ऊस शेतीकडे वळविला आहे. सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, बीड भागांत ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना कारखानदारांकडून प्रोत्साहन सवलती दिल्या जात आहेत. परिणामी आतापर्यंत एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर नव्याने ऊस लागवड झाली असून पुढील गळित हंगामासाठी विक्रमी असा १० ते ११ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाचे पीक असेल, अशी माहिती कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

साखर कारखान्यांनी कर्ज थकविल्यामुळे राज्य सहकारी बँकेचे २९०० कोटी रुपये अडकून पडले होते. ज्या कारखान्यांनी कर्ज थकविले ते ताब्यात घेऊन तसेच त्यातील काही कारखान्यांची विक्री करून राज्य बँकेने आतापर्यंत १५६३ कोटी रुपयांची वसूली केली असून अजूनही काही कारखान्यांकडे १३३७ कोटी रुपये अडकले आहेत. ही रक्कम वसुलीसाठी बँकेने या कारखान्यांची अनेकवेळा विक्री करण्याचा प्रयत्न केला, पण कारखाना क्षेत्रात ऊसच नसल्याने हे कारखाने विकत घेण्यास कोणी पुढे येत नव्हते. मात्र आता हे कारखाने दीर्घ मुदतीवर चालविण्यास अनेक संस्था पुढे आल्या आहेत. त्यानुसार लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.

नव्या धोरणानुसार सातारा येथील रयत सह. साखर कारखाना आणि कोल्हापूर येथील उदयसिंह गायकवाड साखर कारखाना हे अथनी शुगर या कंपनीस दीर्घ मुदतीसाठी भाडय़ाने चालविण्यास देण्यात आले आहेत.