नोटीस देऊनही पालिकेने प्रतिसाद न दिल्याने कारवाई

दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राबवण्यात येणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना मुंबई महापालिकेच्या तीन उपनगरीय रुग्णालयांतून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांसमोर उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेचे कुर्ला भाभा रुग्णालय (कुर्ला), वीर सावरकर रुग्णालय (मालाड), एमटी अगरवाल (मुलुंड) या तिन्ही रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना नोव्हेंबर २०१८ पासून खंडित केली आहे. खंडित केलेली सेवा पुन्हा सुरू करावी, यासाठी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला होता.‘रुग्णालयांना अशा प्रकारे अचानकपणे न वगळता पुन्हा योजनेमध्ये सामावून घ्यावे, असे पत्राद्वारे जनआरोग्य हमी सोसायटीला २ जानेवारीला कळविले होते. मात्र अद्याप कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही,’ असे नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी सांगितले. बांधकाम सुरू असल्याने सेवा काही काळ स्थगित केली आहे. मात्र सोसायटीने कोणतीही पूर्वसूचना न देता जनआरोग्य योजनेतून वगळल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. जनआरोग्य हमी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले, ‘नोटीस पाठवूनही उत्तर न आल्याने कारवाई केली आहे. कोणत्याही रुग्णालयाला वगळले जात नाही.’

योजनेचा लाभ

२ जुलै, २०१२ मध्ये तिन्ही रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत कुर्ला भाभा (४९), एम टी अगरवाल (३९६) आणि विनायक दामोदर सावरकर (१२४) शस्त्रक्रिया झाल्या आहेत. वरील रुग्णालयात प्रत्येक महिन्याला अनुक्रमे एक, पाच आणि दोन या प्रमाणे शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच, या रुग्णालयांना आत्तापर्यंत ३५ ते ३६ नोटीसा पाठविल्या आहेत, अशी माहिती योजनेतील अधिकाऱ्यांनी दिली.