18 January 2021

News Flash

करोनामुळे रुग्णालय बंद करणे हा पर्याय नाही – डॉ. साळुंखे

डॉक्टर- परिचारिकांना पुरेशी विश्रांती द्या!

संग्रहित छायाचित्र

संदीप आचार्य

मुंबई व पुण्यासह राज्यातील अनेक रुग्णालयात डॉक्टर व परिचारिका करोना रुग्णांच्या संपर्कात आले अथवा त्यांना करोना झाल्यास यंत्रणेकडून रुग्णालयाला सील ठोकले जाते. ते योग्य नसल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांचे प्रमुख आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.  तसेच करोनाच्या चाचण्या वेगाने होण्यासाठी केंद्राने मोठय़ा प्रमाणात चाचणी किट दिले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

जेवढय़ा वेगाने प्रशासकीय यंत्रणा या रुग्णालयांना टाळे लावते, तेवढय़ाच वेगाने निर्जंतुकीकरण करून रुग्णालय सुरु करण्यासाठी मदत का करत नाही, असा सवाल डॉ. साळुंखे यांनी ‘लोकसत्ता‘ ला दिलेल्या मुलाखतीत केला. ज्या रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी करोनाबाधित असतील तेथील संबंधित सर्वांना तात्काळ विलगकरण कक्षात ठेवून उपचार केले जावेत तसेच रुग्णालयाच्या संपूर्ण निर्जंतुकीकरणाचे काम तात्काळ हाती घेऊन लवकरात लवकर रुग्णालय पुन्हा सुरू केले पाहिजे, अशी शिफारस मी शासनाला केली आहे.

सध्या मोठय़ा संख्येने ज्या रुग्णांमध्ये फारशी लक्षणे आढळत नाहीत त्यांना घरातच विलगीकरणात ठेवले जाते. अशी मंडळी खरोखरच घरात राहातात का, तसेच घरातही अन्य लोकांच्या संपर्कात येत नाहीत याची  ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे घरातील विलगीकरणाऐवजी महापालिका व राज्य सरकारच्या विलगीकरण कक्षातच अशा व्यक्तींची व्यवस्था केली पाहिजे, असेही शासनाला सांगितल्याचे डॉ साळुंखे म्हणाले.

महाराष्ट्रात त्यातही मुंबई व पुण्यात टाळेबंदी व घरात विलगीकरण गंभीरपणे पाळले जात नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. करोनाच्या लढाईत मास्क व पीपीइ किटचा कोणताही तुटवडा नसल्याचे वरिष्ठ पातळीवर वारंवार सांगितले जाते तर रुग्णालय पातळीवरील मास्क व करोना किटचा तुटवडा असल्याच्या तक्रारी डॉक्टर व परिचारिकांकडून करण्यात येतात याकडे लक्ष वेधले असता तोही प्रश्न सुटण्यासाठी प्रशासनाने योग्य समन्वय साधण्याची शिफारस केल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

राज्य शासनाने करोनावरील उपचार व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या तीन वेगळ्या समित्यांची नियुक्ती केली आहे. या तिन्ही समित्यांच्या निष्कर्ष व उपाययोजनांचे एकत्रिकरण करून उपाचारासीठीचा एकच समान प्रोटोकॉल केला जावा, असेही सुचविल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह काही रुग्णालयात डॉक्टर व परिचारिका अतिरिक्त काम करत  आहेत. त्यामुळे डॉक्टर व परिचारिकांना पुरेशी नव्हे तर सक्तीची विश्रांती व सकस आहार मिळालाच पाहिजे, असेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 12:42 am

Web Title: closing the hospital is not an option because of the corona abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 शिवडी सागरी सेतूच्या कामाला परवानगीची मागणी
2 मुंबई महापालिकेने बदलले करोना चाचणीचे नियम
3 Coronavirus : मिरा भाईंदरमध्ये 3 नव्या रुग्णांची भर,एकूण रुग्णांची संख्या 52 वर
Just Now!
X