पडदे, झालरी, शोभेच्या छत्र्या, फेटे, कुडत्यांना मागणी नाही

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई: मोठे मंडप वा घरगुती सजावटीच्या निमित्ताने मागणी असलेल्या गणेशोत्सवातील कपडा बाजारालाही यंदा करोना व टाळेबंदीमुळे आलेल्या निर्बंधाने व मंदीने घेतले आहे. ग्राहकांकडून मागणी नसल्याने घरगुती गणेशोत्सवाला लागणारे कापडी पडदे, झालर, शोभेच्या छत्र्या, गणपतीच्या शाली, तर सार्वजनिक मंडळांना लागणारे सजावटीचे कापड, मोठाले पडदे, कापडी झुंबर, फेटे, टोप्या अशा नाना वस्तू गोदामांमध्ये पडून आहेत, तर मोठय़ा गणेशमूर्ती यंदा नसल्याने सोवळ्याचे कापड विकणारे आणि नेसावणारेही यंदा मंदीच्या गर्तेत आहेत.

मंडपाचे कंत्राटदारही जिथे खरेदीसाठी येतात त्या लालबाग मार्केटमधले ‘श्री राम ड्रेस’चे हेमंत पटेल सांगतात, ‘‘यंदा मंडपच नसल्याने ना डेकोरेटर फिरकले ना मंडळवाले. अनेकांनी गेल्या वर्षीच्याच मालावर भागवले. घरगुती गणपतीसाठीही किरकोळच खरेदी होत आहे. त्यामुळे झालेले नुकसान लाखोंचे आहे.’’ या बाजारपेठेतील प्रत्येक दुकानदाराचे हजारो मीटर कापड दरवर्षी विकले जाते. त्याशिवाय मंडळाच्या मागणीनुसार अब्दगिरी, छत्री, टोप्या, फेटे, शेले यांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा मागणीच नसल्याने गतवर्षीचाच माल अद्याप पडून असल्याचे दुकानदार सांगतात.

गणेशमूर्तीच्या सोवळ्यासाठी लागणाऱ्या मलमल कापडासाठी हिंदमाता बाजारपेठ प्रसिद्ध आहे. मूर्तिकार, सोवळे नेसावणारे कलाकार यांची मोठी गर्दी इथे असते; परंतु यंदा केवळ १० टक्के  कापड विकले गेल्याचे हिंदमाता येथील दुकानदारांनी सांगितले. ‘‘दरवर्षी दहा ते बारा सोवळे नेसवणारे कलाकार जवळपास २० हजार मीटर कपडा घेऊन जातात. या वर्षी मोठय़ा मूर्ती नसल्याने थोडाच माल विकला गेला,’’ अशी खंत ‘श्रीनाथ फॅब्रिक’चे राजेश भगेश यांनी बोलून दाखवली.

या काळात एकसारखे कुडते किंवा टी-शर्टनाही मागणी असते. एखादाच वापरात येतील अशा लाखो कुडत्यांची निर्मिती धारावीत केली जाते; पण कारागीर आणि मागणीही नसल्याने तिथेही शुकशुकाट आहे. ‘‘गणेशोत्सवाला महिना बाकी असतानाच आमची लगबग सुरू होते. मुंबईसह राज्यभरात आमचे कुडते जातात. ८० रुपयांपासून तर २०० रुपयांपर्यंतचे कुडते खास तयार केले जातात. प्रवासामुळे राज्यातून मागणी नाहीच. तसेच मुंबई-ठाण्यातील मंडळांमध्येही फारसा उत्साह नाही,’’ असे धारावीतील कुडता व्यापारी प्रदीप श्रीवास्तव सांगतात. मस्जिद बंदरमध्ये घाऊक दरात टी-शर्ट निर्मिती आणि छपाई होते; पण यंदा तिथेही कुणी फिरकताना दिसत नाही. ‘‘दरवर्षी शेकडो मंडळे आणि घरगुती गणपतीकरिता टी-शर्ट खरेदी करतात. जवळपास तीन महिने हे काम चालते. दहीहंडी, गणेशोत्सव मिळून चार ते पाच लाख टी-शर्ट विकले जातात; परंतु यंदा ही बाजारपेठ ठप्प आहे,’’ अशी माहिती चकाला मार्ग येथील टी-शर्ट विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवरून दिली.

सोवळे नेसवणारे कलाकारांसमोर पेच

गणपतींना सोवळे नेसवणारे हर्षद वारंग दरवर्षी चारशे ते पाचशे गणेशमूर्तीना सोवळे नेसवतात. त्यातील जवळपास २०० सार्वजनिक गणेशमूर्ती असून ३० मूर्तीचे सोवळे रोज बदलले जाते. एका गणपतीला किमान ३९ ते ४२ मीटर कापड लागते. आकर्षक काठ, नेसण्याच्या पद्धतीवर भाव ठरवला जातो. २ हजारांपासून ते ७ हजारांपर्यंत हा दर आहे. ‘‘यंदा मोजक्याच मंडळांकडून प्रतिसाद मिळाला, तेही लहान मूर्तीसाठी. वर्षांतून एकदा आमच्या कलेच्या माध्यमातून आम्ही अर्थार्जन करतो; पण त्यावरही गदा आल्याचे वारंग सांगतात.