गरजूंना परवडणाऱ्या दरात उपलब्ध; वापरलेल्या ‘ब्रेस’ दान करण्याची सुविधा

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयात क्लबफूट आजाराच्या बालकांसाठी ब्रेस बँक (डब्ल्यू-रिद्धी) सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून गरजू बालकांसाठी कमी किमतीमध्ये ब्रेस उपलब्ध होणार आहेत. वापरलेल्या ब्रेस दान करण्याची सुविधा यामुळे उपलब्ध होणार असून भारतातील ही पहिली बँक आहे.

‘क्लब फूट’ हा जन्मत: असलेला पायाच्या अस्थिव्यंगाचा आजार आहे. दर ८०० नवजात बालकांमध्ये एकाला आजार होतो. मुलींपेक्षा मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. जगभरात दरवर्षी दोन लाखांहून अधिक मुले या आजारासह जन्माला येत आहेत, तर भारतात ३५,००० नवजात बालकांना हा आजार जन्मत: असल्याचे आढळते. पैशांअभावी व अज्ञानामुळे शेकडो मुले योग्य वेळी उपचारापासून वंचित राहतात. वाढत्या वयानुसार हे व्यंग गंभीर स्वरूप धारण करते. त्यावरील उपचारसुद्धा क्लिष्ट होत जातात. या आजाराचे लवकर निदान करून वेळेत उपचार केल्यास तो संपूर्णत: बरा होऊ शकतो, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

या रुग्णांना क्लबफु ट वापरासाठी दिले जातात. परंतु या ब्रेस महाग असून गरजू कुटुंबीयांना घेणे परवडत नाही. तसेच वापरलेल्या ब्रेस गरज नसल्यावर काय करावे, असा प्रश्नही पालकांपुढे उभा राहतो. तेव्हा यावर मार्ग काढत वाडिया रुग्णालयात पहिली ब्रेस बँकेची (डब्ल्यू-रिद्धी) स्थापना करण्यात आली आहे. सयामी जुळ्या रिद्धी-सिद्धीच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

‘एखाद्या गरजू कुटुंबीयांना क्लबफुटची गरज भासल्यास स्वस्तात ते उपलब्ध होण्यासाठी स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून राहावे लागत होते. त्याऐवजी आता आम्ही पालक आणि डॉक्टरांना वापरलेले क्लबफूट ब्रेस या बँकेत दान करण्यास प्रोत्साहित    करीत आहोत. ब्रेसचे नूतनीकरण करून ज्यांना गरज आहे, त्यांना कमी किमतीत ते उपलब्ध करून देणे, हा यामागे उद्देश असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या बालअस्थिरोगतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. रुजुता मेहता यांनी सांगितले.

जन्मत: क्लबफुटचा आजार असणाऱ्या १५०० हून अधिक नवजात मुलांवर गेल्या १० वर्षांत रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहे. भारतातील सर्वात मोठ्या क्लबफूट उपचार केंद्रांपैकी एक ठरले आहे. इडिओपॅथिक क्लबफिटव्यतिरिक्त आम्ही सिंड्रोमिक क्लबफिट, एटिपिकल क्लबफिट हा आजार असलेल्या मुलांच्या उपचारांमध्ये विशेष कौशल्य विकसित केले आहे असे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. क्लबफुट आजार काय आहे?

‘कल्बफुट आजारामध्ये बाळाचे पाय गुडघ्यातून आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वळलेले असतात. उपचारामध्ये पायावर प्लॅस्टर लावून पुन्हा एका विशिष्ट रचनेत वळविण्यासाठी ब्रेसचा वापर केला जातो. या ब्रेसच्या मदतीने गुडघ्यापासून पायापर्यंत हाडांना विशिष्ट रचनेमध्ये बांधून ठेवल्यामुळे पुन्हा पाय सरळ होण्यास मदत होते. हे ब्रेस बालकाला किमान चार वर्षांपर्यंत वापरावे लागतात आणि एका ब्रेसेसची किंमत सुमारे दोन हजार रुपयांपासून सुरू होते. यातही अनेक प्रकार असून त्यानुसार किमती वेगवेगळ्या असतात. बाळाची उंची वयोमानुसार वाढते. त्यामुळे दर तीन महिन्याला ब्रेस बदलाव्या लागतात. एकदा वापरलेल्या ब्रेसचा पुनर्वापर केला जावा आणि कुटुंबावरील आर्थिक ताण कमी व्हावा यातून ही ब्रेस बँकची संकल्पना उदयास आली’, असे डॉ. रुजुता मेहता यांनी सांगितले.