मुंबई-ठाणे-नवी मुंबई परिसरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजनेचा अंतिम मसुदा महिनाभरात जाहीर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी ठाण्यात केली. ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या या पुनर्विकास योजनेत बेकायदा इमारतींचाही समावेश केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुढील आठवडय़ाच्या अखेरीस मुंबईसाठी पहिल्या टप्प्यात ही योजना जाहीर केली जाईल. त्यानंतर तीन आठवडय़ात ठाणे, नवी मुंबईसाठी एकत्रित पुनर्विकास योजनेचा आराखडा जाहीर केला जाणार आहे. राज्य सरकारमार्फत आराखडा जाहीर झाल्यानंतर ठाणे, नवी मुंबई महापालिकेस त्यावर हरकती, सूचनांची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.   ठाणे शहरातील कापूरबावडी पुलावरील मुंबई-घोडबंदर मार्गिकेचा शुभारंभ सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी ठाणे शहराच्या विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून भरीव योजना तसेच निधी दिला जाईल, असे आश्वासनही दिले.
मुंबईच्या तुलनेत ठाण्याची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून येथील नागरीकरणाचे प्रश्नही गुंतागुंतीचे होत आहेत. ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात गेल्या काही महिन्यांत इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेता अशा  इमारतींच्या पुनर्विकासासाठी सामूहिक पुनर्विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे सामूहिक विकास करताना ठाणे शहरात जमीन अधिग्रहणाचे काही प्रश्न प्रलंबित होते. अधिकृत आणि बेकायदा अशा इमारती ज्या जमिनींवर उभ्या राहिल्या आहेत, त्याची मालकी वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत जमीन एकत्रित करताना अडचणी उभ्या राहण्याचा प्रश्न आहे. हा अवघड प्रश्न निकाली काढण्यात सरकारला यश आले आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.
कळव्यात रविवारी रात्री कोसळलेल्या इमारतीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर पालकमंत्री गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले होते. एकत्रित पुनर्विकास योजनेची घोषणा करा, असा त्यांचा आग्रह होता.

उड्डाणपुलांची संथ गती!
मुंबई-घोडबंदर वाहतूक प्रकल्पातील उड्डाणपुलांच्या कामांना उशिरा सुरुवात झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी या मार्गावर पातलीपाडा, वाघबीळ, मानपाडा या तीन उड्डाणपुलांचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन करण्यात आले आहे, तर सोमवारी कापूरबावडी पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली.
खरे तर हे सगळे प्रकल्प एकत्र सुरू होण्याची गरज होती, असा टोला या वेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. कापूरबावडी पुलाच्या इतर चार मार्गिकांची कामे मार्च २०१४ पर्यंत पूर्ण केली जातील, असे आश्वासन या वेळी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने देण्यात आले.